आष्टी (प्रतिनिधी) तालुक्यात बालविवाहांच्या घटना घडू नये अल्पवयीन मुलांकडून काम करुन न घेता बालमजूरी थांबावी यासाठी प्रबोधन, जनजागृती करत असतांना कठोर उपाययोजना कराव्यात त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे,अशा प्रकरणातील जबाबदार व्यक्ती व दोषींवर कडक कारवाई करा, असे निर्देश आष्टीचे तहसिलदार वैशाली पाटील यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आष्टी तालुक्यात बालविवाह मुक्त व बालमजूरी यासाठी आष्टी तालुक्याची बालसंरक्षण समितीची बैठक तहसिलदार वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात बुधवार दि २१ में रोजी सकाळी १२ वाजता संपन्न झाली. यावेळी पुढे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षण विभाग, पंचायत विभाग, आरोग्य विभाग, गाव पातळीवरील पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यासारखे कर्मचारी यांची बालविवाह रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यासाठी बाल कामगार, शाळा माध्य, मुले यांबाबतही जणजागृती करण्यात यावी, ग्रामस्तरावर ग्राम कृती दल स्थापन करण्यात यावे.ग्राम बाल संरक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समिती यासारख्या समित्यांमधील सदस्य ही महत्त्वाचे योगदान देऊ शकतात. बालविवाहाच्या घटना घडल्यास त्यास जबाबदार व्यक्तिंवर कारवाई होणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या सभोवताली कुठे बालविवाह होत असल्यास त्याची माहिती १०९८ व ११२ या टोल फ्रि क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही तहसीलदार पाटील यांनी बोलताना सांगितले.या बैठकीस बाल संरक्षण समितीचे सचिव बाल एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर,बाल संरक्षण समीतीचे सदस्य पोलिस निरीक्षक शरद भुतेकर,आरोग्य विभागाचे प्रतिनिधी डॉ पवन इंगोले,स्थानिक सामाजिक प्रतिनिधी अविनाश कदम, अनिरुद्ध धर्माधिकारी, विकास मस्के,बाल प्रतिनिधी प्रतिक अशोक पवार,ओम वाल्हेकर, शिक्षण विभागाचे सोनवणे,बाल संरक्षण कक्ष प्रतिनिधी राजेंद्र गळगटे आदी संरक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते.
➡️ मंगल कार्यालय चालकांनी पुराव्यानिशी लग्न बुकींग करावी.
तालुक्यातील सर्व विवाह मंगल कार्यालये, फंक्शन हॉल चालकांनी वधू आणि वर यांच्या जन्मासंबंधी पुरावा म्हणून आधार कार्ड न घेता निर्गम उतारा किंवा शाळेचा दाखला पुरावा घेण्यात यावा तेव्हाच विवाहाची बुकींग करून घ्यावी अन्यथा बाल विवाह झाल्यास संबंधित मंगल कार्यालय चालक व बॅन्ड वाजंत्री वाले,आचारी आणि इतर व्यक्तीनवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिले.