पाथर्डी प्रतिनिधी:- मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी करणारे व मराठा आरक्षणा विरोधात वक्तव्य करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या कथीत विधानाच्या निषेधार्थ पाथर्डी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील कोरडगाव चौकात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या फोटोची होळी करण्यात आली.
यावेळी मराठा तरुणांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्वपक्षीय आमदार, खासदार व नेत्यांचा निषेध व्यक्त केला. संघर्षयोद्धे मनोज जरांगे जिंदाबाद, सदावर्ते मुर्दाबाद, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे.. कोण म्हणतं देणार नाही.. घेतल्या शिवाय राहणार नाही… डॉ बाबासाहेब आंबेडकर झिंदाबाद आदी घोषणा देत जोरदारपणे घोषणाबाजी करण्यात आली व मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थित तरुणांनी भर चौकात सदावर्ते यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व राग व्यक्त करत त्यांच्या प्रतिमेची होळी केली. मनोज जरांगे यांना आता ग्रामीण व शहरी भागातुन वाढता पाठिंबा मिळत असुन अनेक ठिकाणी पुढार्यांना गावबंदी नंतर आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या विरोधात मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. मराठा आरक्षण लढ्याचे लोन आता राज्यात सर्वत्र पसरत आहे.
यावेळी उद्धव माने, आप्पासाहेब बोरुडे, विवेक देशमुख, अमोल पाठक, सोमनाथ माने, दीपक मोरे, अंकुश चितळे, लालाभाई शेख, देवा पवार, मेजर मोरे यांच्यासह मराठा तरुण उपस्थित होते.