आष्टी(प्रतिनिधी) प्रत्येक गावात सामूहिक श्रमदानातून पाणलोट चळवळ निर्माण व्हावी या उद्देशातून केंद्र सरकारने राज्यातील ३० जिल्ह्यात पाणलोट यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पाणलोट रथयात्रा शुक्रवार दि २८ मार्च रोजी आष्टी तालुक्यात आगमन होणार असून वाघळुज व लमाण तांडा येथे रथयात्रा येणार असल्याची माहिती पाणलोट समिती वाघळूजच्या अध्यक्षा सुनंदा सुभाष गुंड यांनी दिली.
या यात्रेचे उद्घाटन आ. सुरेश धस यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून बीड जिल्हा जलसंधारण अधिकारी संजय आमले,तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी गोकुळ बागलाणे,माजी आ. साहेबराव दरेकर, सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे आदी उपस्थित राहणार आहेत.या यात्रेच्या नियोजनासाठी व स्वागतासाठी प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा तथा उपविभागीय जलसंधारण अधिकारी सतिश पाटील आणि त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.
➡️ पाणलोट कामांवर श्रमदान अपेक्षित
सर्व यंत्रणांना एकत्र येऊन गावोगावी पाणलोट चळवळ निर्माण व्हावी, या अनुषंगाने मृद व जलसंधारण कामांचे भूमिपूजन करणे, पाणलोट कामांवर श्रमदान करणे, पाणलोट योद्धे निवडणे इत्यादी कामांचे सूक्ष्म नियोजन करून या उपक्रमांतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, बचत गटातील महिला, स्वयंसेवी संस्था व शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन बीड जिल्हा जलसंधारण अधिकारी संजय आमले यांनी केले आहे.