spot_img
spot_img

मढीत उसळला भाविकांचा जनसागर ———————————————-गर्दीचा उच्चांक

मढी (प्रतिनिधी ) कानिफनाथ महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अलख निरंजण ! आशा घोषणांच्या जयकारात व डफ ताशां शंख व दफांच्या तालबद्ध आवाजामध्ये राज्यातसह गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील मिळून सुमारे आठ लाख भाविकांनी मढी येथे यात्रेनिमित्त चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. रंगपंचमी हा नाथांचा समाधी दिन असल्याने आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचा जनसागर उसळला.आत्तापर्यंतचे यात्रेचा सर्वाधिक गर्दीचा उच्चांक यावर्षी झाला .

चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेकडे भटक्यांची पंढरी म्हणून बघितले जाते. रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथांची संजीवन समाधी दिवस असल्याने आठरा पगड भटक्या जातींचे भाविक येथे राहून विविध धार्मिक विधी करतात. यात्रेत यंदा बाहेर गावचे नाथ संप्रदायाची परंपरा पाळणारे व देवावर श्रद्धा असणाऱ्या व्यावसायिकांची मोठी गर्दी झाली असून विक्रेत्यांकडील नवनवीन मालामुळे ग्राहकांना विविध खाद्यपदार्थ व साहित्य खरेदीची मोठी संधी यामुळे मिळाली आहे. संपूर्ण चारशे एक्कर परिसर यात्रामय होऊन यंदा पैठण येथे जाणाऱ्या अनेक दिंड्या मढी मार्गे आल्याने मंगळवारी दुपारी गर्दी वाढूण बुधवारी सायंकाळपर्यंत कायम होती .

पुणे, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, ठाणे, कल्याण, नाशिक या भागातील भाविकांची सर्वाधिक संख्या होती. मढी पासून सुमारे पाच किलोमीटर वर्तुळामध्ये सर्वत्र वाहतूक कोंडी , देवकाठया ची गर्दी, व भाविकांचा गडाकडे जाण्यासाठीचा मार्ग फुलून गेला होता. गडाकडे येण्यासाठी मायंबा , घाटशिरस, तिसगाव, निवडुंगे व पाथर्डी येथून रस्ते आहेत. भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता बंदोबस्तावरील पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरू करून कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला. तरीही नगर पाथर्डी व पाथर्डी पैठण असा रस्ता पूर्णपणे वाहतुकीच्या कोंडीत हरवून गेला होता. पाथर्डी शहरात तर वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस अत्यंत कमी पडले. काही व्यावसायिकांनीच वाहतूक पोलिसांचे काम करत कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला. राज्य परिवहन मंडळाच्या नगर विभागातील व नाशिक प्रादेशिक विभागातील मिळून 250 बस गाड्या विविध भागातून यात्रेकरूंच्या सोयीसाठी तैनात होत्या. पाथर्डीच्या दोन्ही बस स्थानकांवर भाविकांसाठी विशेष सुविधा कक्ष उभारण्यात आला होता. प्रचंड पोलीस बंदोबस्त असूनही मढीच्या यात्रेत नेहमीप्रमाणे मोबाईल चोरी, साखळी चोर व पाकीट मारी मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र किरकोळ स्वरूपाची नोंदणी झाल्याने कागदोपत्री आकडा कमी दिसतो. सर्वाधिक गुन्हेगारी पैठण गेट म्हणजे उत्तर बाजूने देव काठ्यांच्या प्रवेशद्वारा कडून झाली. राज्याच्या विविध भागातून 65 हजारांहून अधिक देवकाठ्या काल दुपारपासून मंदिराच्या कळसाला लागल्या.

सर्वाधिक आर्थिक उलाढाल हलवाई व्यवसाय झाली. यंदा श्रीरामपूर तालुक्यातील रेवडी, गोडी शेव विक्रेत्यांची उपस्थिती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. भाविकांची संख्या वाढल्याने रेवडी व्यवसायातही मोठी उलाढाल झाली. सर्व विक्रेत्यांनी मिळून 500 टनानहून अधिक रेवड्या उत्पादित केल्या आहेत. येत्या आठ दिवसात या रेवड्या विकतील असा विश्वास प्रमुख रेवडी विक्रेते बाळासाहेब भोसले यांनी व्यक्त केला. श्रीरामपूरच्या पट्ट्यातून जास्त माल आल्याने यंदा भाव वाढ झाली नाही. 140 ते 160 रुपये किलो या दराने प्रसादासाठी रेवडी विकली गेली. चपट्या रेवड्या प्रसाद म्हणून वाटण्यासाठी तर गोल रेवड्या देवाचे दर्शन घेताना कळसाला प्रसाद अर्पण करत कळसाच्या दिशेने भिरकावल्या जातात. या उधळलेल्या रेवड्या भाविकांच्या डोक्यावर पडून दगड पाडल्यासारखा भास होतो. तरीही लोकांची तक्रार नसते. नाथ पूजा साहित्य, शेतीसाठी लागणारी लोखंडी अवजारे, स्वयंपाक घरात लागणारी सर्व प्रकारच्या लाकडी वस्तू याचीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. स्टेशनरी बाजारामध्ये मात्र ग्राहकांची गर्दी कमी होती. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पिण्याच्या पाण्याला मागणी जास्त होती. सर्व व्यापाऱ्यांनी मिळून सुमारे 2000 बॉक्स पाणी विकले तर ग्रामपंचायतीचे स्टॅन्ड पोस्ट ठीक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी अहोरात्र सुरू होते. देवस्थान समितीने यंदा दर्शन व्यवस्थआ अत्यंत व्यवस्थित केली. त्यामुळे दर्शनाचा वेग वाढला . दोन बाजूंनी भाविकांना बाहेर जाण्यासाठी रस्ता असल्याने गाभाऱ्यामध्ये गर्दी झाली नाही. व्हीआयपी दर्शन व्यवस्था खरोखरच व्हीआयपी सारखी होऊन अन्य भाविकांना सुद्धा त्याचा त्रास झाला नाही. संपूर्ण गाभारा आकर्षक फुलांच्या सजावटीसह विद्युत रोषणाईने उजळून निघाला .

यंदा यात्रेसाठी जागा अधिक वाढल्याने सुमारे साडेतीनशे नवीन मंडप स्थापले जाऊन यात्रा आणखी वाढली. पुढील वर्षी राज्यातील सर्वाधिक मोठी यात्रा म्हणून मढी देवस्थानच्या यात्रेकडे बघितले जाईल असा विश्वास सरपंच संजय मरकड यांनी व्यक्त केला. समाधी मंदिराच्या गाभाऱ्याच्या परिसरात व पायऱ्या चढ-उतार करण्याच्या दरम्यान चोरट्यांनी विविध भाविकांवर हात साफ केला. पनवेल भागातील बहुसंख्य भाविक समान वेशभूषेत आल्याने ठीक ठिकाणी यात्रेमध्ये भगव्या रंगाचे भाविक दिसून यात्रेला एक प्रकारे भगवी किनार शोभून दिसत होती. धार्मिक प्रथा व परंपरा न पाळणाऱ्या व्यावसायिकांना यात्रेत बंदी घातल्याचा परिणाम म्हणून विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा यात्रेमध्ये यंदा आवर्जून हजेरी लावत या निर्णयाचा फायदा मोठ्या प्रमाणावर झाल्याचे निष्कर्ष काढले.

पूर्वी जात पंचायती भरत असल्यामुळे षष्ठीपासून द्वादशीपर्यंत भटक्या समाजाची गर्दी असे. आता शासनाने जात पंचायतीला बंदी घातल्यापासून गेल्या दहा वर्षात जातपंचायती बंद झाल्याने भटके समाज सुद्धा पंचमीला दर्शन घेऊन गावी परततात. यंदा देवाच्या नावावर मढी यात्रेमध्ये एकही पशुहत्या झाली नाही. बहुसंख्य प्रमाणात अवैध धंदे रोखले गेले.भाविकांची लूट करणारे टायगर, चक्री, वादी, तीन पत्ते, सोरट असे प्रकार यात्रेत अजिबात घडले नाहीत. दुपारनंतर पोलिसांचा फिरता बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढला.

देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड ,कोषाध्यक्ष
बबन मरकड ,भाऊसाहेब मरकड , सचिव विमलताई मरकड ,विश्वस्त रवींद्र आरोळे ,सचिन गवारे , शिवजित डोके , शामराव मरकड ,डॉ . विलास मढीकर .ग्रामसेवक गणेश ढाकणे कार्यकारी अधिकारी अशोक पवार यांनी येनाऱ्या भावीकांचे स्वागत करत व्यवस्थेवर देखरेख ठेवली .ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच संजय मरकड ग्रामसेवक लंवाडे व सर्व सदस्यांनी नियोजन केले .यंदा चतुर्थी व पंचमी अशी मिळून भव्य यात्रा झाल्याने भाविकांना सुलभपणे दर्शन मिळाले सायंकाळी पाच नंतर परिसरातील भाविकांची गर्दी वाढल्याने सर्वत्र वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात झाली. अनेक वर्षांनंतर लोकनाट्य मंडळे व ऑर्केस्ट्रा यात्रेत आल्याने तमाशा रसिकांसह सर्वच रसिक यात्रेकरूंनी लाभ घेतला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!