कडा (प्रतिनिधी):- वडिलांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला, रविवारी रात्री अकरा वाजता अंत्यविधी झाला आणि मुलगा पृथ्वीराज तांगडे याने दुःखाचा प्रचंड डोंगर घेऊन दहावीची परीक्षा दिली.
कोणावर कधी-कशी दुःखाची वेळ येईल किंवा भयंकर असा प्रसंग येईल हे सांगता येत नाही. अशीच धक्कादायक घटना कडा येथे घडली. कडा येथील एक्स टेलर म्हणून परिसराला परिचित असलेले विजय तांगडे ( वय ४९ वर्षे ) यांचा रविवारी दुपारी तीन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. क्षणात कुटुंबाचा आधार गेला, कुटुंबाला वडिलांचा आभाळा एवढा आधार असतो. वडिलांचा धक्कादायक मृत्यू झाल्याने कुटुंब उघड्यावर पडले. मुलगा पृथ्वीराज हा इयत्ता दहावीची परीक्षा देत आहे. कडा येथील पत्रकार राजेंद्र तांगडे यांचे विजय तांगडे हे कनिष्ठ बंधू होते. रविवारी रात्री अकरा वाजता विजय तांगडे यांच्या पार्थिवावर कडा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मोतीलाल कोठारी विद्यालयात प्रवेशित असलेल्या पृथ्वीराजची परीक्षा कडा येथील श्रीराम विद्यालयात सुरू आहे. सोमवार दिनांक १० मार्च रोजी विज्ञान विषयाचा पेपर होता. प्रचंड दुःख झाल्याने पेपरला जावे की नाही अशा द्विधा मनस्थितीत पृथ्वीराज होता परंतु नातेवाईकांनी आधार देत त्याला समजावून सांगितले आणि त्याने मन घट्ट करीत परीक्षेचा पेपर दिला. परीक्षेसाठी असलेले पर्यवेक्षक श्री शिंदे यांनीही परीक्षा सुरू होण्यापूर्वी पृथ्वीराज यास समजावून सांगून आधार दिला. नातेवाईक, पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख व मित्रपरिवार असा सर्वांनी दुःखद प्रसंगी आधार दिल्याने पृथ्वीराज यांनी दहावीचा पेपर व्यवस्थित दिला.