पाथर्डी : पायी येणाऱ्या भाविकांचे जथ्थे, मोहटा देवीचा जयघोष, प्रचंड उत्साह, मुक्तहस्ताने निसर्गाची उधळण करणारा विशाल डोंगर, देवीच्या दर्शनाची आस अशा सर्व भावनिक व धार्मिक वातावरणामध्ये मोहटादेवी गडाकडे येणारे सर्व मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
शारदीय नवरात्रोत्सवातील सातव्या माळेची पर्वणी साधत श्री क्षेत्र मोहटा देवी गडावर सुमारे पाच लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले, गडावर शनिवारी व रविवार भाविकांचा महासागर लोटला होता. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वाहतुकीचे अतिशय योग्य नियोजन केल्याने कुठेही वाहतुकीची कोंडी न होता भाविकांना निर्विघ्नपणे देवीचे दर्शन घेता आले.
गाभारा मंदिरासमोर मुख्य दर्शन हॉलमध्ये नऊ रांगा अहोरात्र सुरू होत्या. त्यामुळे भाविकांना सुलभ आणि काही वेळेत दर्शन मिळाले. शुक्रवारपासून मोहटादेवी गडावर भाविकांची पायी येण्यासाठी गर्दी केली होती. दुचाकी व चार चाकी वाहनांनी पूर्ण रस्ता भरून गेला होता. पोलिसांचे योग्य नियोजन व मुख्ये रस्ते चांगले झाल्याने यंदा वाहतुकीची कोंडी झाली नाही. वाहतूक सुरळीत करताना पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक व्हीआयपी भाविकांच्या आडमुठ्या भूमिकेचा त्रास सहन करावा लागला.
रस्त्यात ठिकठिकाणी विविध मंडळांनी व युवा नेत्यांनी भाविकांसाठी स्वागत कमानी उभारल्या होत्या. भाविकांसाठी मोफत फराळ वाटपाचे स्टॉल लावले होते. यामध्ये सुवर्ण तरुण मंडळ, विश्वकर्मा तरुण मंडळ, पावन गणपती प्रतिष्ठान, मोरया प्रतिष्ठान इंदिरानगर, सामाजिक कार्यकर्ते इजाजभाई शेख मित्र मंडळ, सुवर्णयुग परिवार ट्रस्ट, दैनिक बचत प्रतिनिधी मंडळ, स्वराज्य युवा प्रतिष्ठान, शेवगाव तालुका मेडीकल असोशियन आदी मंडळांनी भाविकांसाठी फराळ, चहापाणी व औषधांचे मोफत वाटप केले.
पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे, जगदीश मुलगीर, योगेश राजगुरू, पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर, श्रीकांत डांगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. मोहटादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त अॅड कल्याण बडे, डॉ. श्रीधर देशमुख, शशिकांत दहिफळे, विठ्ठल कुटे, अक्षय गोसावी, अनुराधा
केदार, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, कार्यालयीन प्रमुख भीमराव खाडे, संदीप घुले व देवस्थानचे कर्मचारी, पोलिस व महसूल यंत्रणा आदी देवी दर्शन व इतर भाविकांच्या सुविधांसाठी परिश्रम घेत आहेत.