पाथर्डी प्रतिनिधी:- महाराष्ट्रातील करोडो महिलांचे लाडके भाऊजी, होम मिनिस्टर फेम श्री आदेश बांदेकर यांनी खास नवरात्रोत्सव निमित्ताने पाथर्डी येथे आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमास उपस्थित राहून हसत खेळत सुमारे साडेचार तास महिला भगिनींच्या चेहऱ्यावर हसू फुलविले. प्रचंड जल्लोषात आणि उत्साहात मोठ्या संख्येने सहभागी होत महिलांनी या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद दिला.
नवरात्र उत्सवानिमीत्त काल मंगळवारी रात्री ॲड.प्रतापराव ढाकणे मित्रमंडळ व वन मित्र सेवा मंडळाच्यावतीने आदेश बांदेकर यांच्या खेळ मांडीयेला अर्थात होम मिनिस्टर हा महीला वर्गात लोकप्रिय असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे साडेचार तास चाललेल्या कार्यक्रमात बांदेकरांनी रिंग फेकणे, डोक्यावर वही घेऊन चालणे, दोरीच्या उड्या, तळ्यात मळ्यात, संगीत खुर्ची आदी स्पर्धा द्वारे सर्व महिलांशी संवाद साधत महिलांच्या कलागुणांना वाव देत उपस्थितांची मने जिंकली. पैठणी, सोन्याची नथ, आदींसह विविध बक्षीसांची लयसुट केली. या कार्यक्रमासाठी सुमारे पंधरा हजार महिलांची उपस्थिती होती. पाथर्डीतील आजवरचा हा सर्वात मोठा महिलांची उच्चांकी गर्दी असलेला कार्यक्रम ठरला. तर हजारो महिलांना जागे अभावी या मनोरंजक कार्यक्रमास मुकावे लागले.
काल सायंकाळी चार वाजल्यापासून पाथर्डी व शेवगाव तालुक्यातुन आलेल्या हजारो महिलांनी आपले लाडके भाऊजी अर्थात आदेश बांदेकर यांची वाट पाहत तुफान गर्दी केली होती. पाथर्डी येथील स्व. माधवराव निऱ्हाळी सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी संयोजकांच्या अपेक्षे पेक्षा मोठ्या संख्येने महिलांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. आदेश बांदेकर यांची शहरातील नाईक चौक येथुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर प्रतापराव ढाकणे व माजी जिल्हा परीषद सदस्या प्रभावती ढाकणे यांनी त्यांचे कार्यक्रमास्थळी स्वागत केले. यानंतर बांदेकर यांनी महिलांशी हितगुज साधत विविध स्पर्धा घेत विजेत्या महिलांना बक्षीसांचे वाटप केले. संगीत खुर्ची,नृत्य,प्रश्नमंजुषा, असे अनेक प्रात्यक्षिके करुण घेण्यात आले. महिलांनी बांदेकर यांच्या प्रत्येक स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला. उखाने, गाणी, नृत्य, या कारणांनी कार्यक्रम उत्तरोत्तर बहारदार होत गेला. नवरात्र उत्सवात महिलांसाठी असा कार्यक्रम घेण्यात आल्यामुळे हजारो महिलांनी ॲड.प्रताराव ढाकणे यांचे आभार व्यक्त केले. अनेक स्पर्धतून आदेश बांदेकर यांनी निवडलेल्या अखेरच्या तीन स्पर्धकांमध्ये गितांजली राजेंद्र फुंदे यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस म्हणून सोन्याची नथ व पैठणी तसेच द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पुष्पा रणजीत घुगे तर तिसरे पारितोषिक आशा फुंदे यांना प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.प्रतापराव ढाकणे यांनी केले.यावेळी माजी जिल्हा परीषद सदस्या प्रभावती ढाकणे, रत्नमाला उदमले,आरती निऱ्हाळी, सविता भापकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष योगीताताई राजळे, तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, योगेश रासने, देवा पवार, वैभव दहिफळे, संदिप शेठ बाहेती, एम.पी.आव्हाड, कृष्णा आंधळे, किरण शेटे, अदिनाथ खेडकर आदी उपस्थित होते.