पाथर्डी (प्रतिनिधी):- आज पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरू झाले असून या वर्षात संघ समरसता, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, नागरीक कर्तव्य व स्वदेशी या आपल्या विशेष पंचसूत्री कार्यक्रमावर भर देत कार्य करणार आहे. बलशाली हिंदुस्थानाच्या राष्ट्र उभारणीत संघाचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. आज देशात सर्वच क्षेत्रात संघाच्या विविध आयामाद्वारे राष्ट्रीय स्तरावर कार्य सुरू आहे. असे प्रतिपादन संघाच्या धर्मजागरण विभागाचे प्रांत प्रमुख श्रीनिवास पुलैय्या यांनी केले.
पाथर्डी शहरात विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघ गणवेशात सघोष पथसंचलन, शस्त्र पुजन व उत्सव पार पडला यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पुलैय्या बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री तिलोक संस्थेचे सचिव सतिश गुगळे, तालुका संघचालक अरविंद पारगावकर उपस्थित होते.
पुढे बोलताना पुलैय्या म्हणाले की, आज देशात हिंदू समाज एकत्रित येऊ नये यासाठी काही देशविघातक शक्ती काम करत आहेत. परंतु संघाच्या स्वयंसेवकांनी मात्र समाजामध्ये जात जातीभेद, वर्णभेद विसरायला लावून देशहितासाठी समरसतेने व सजगतेने काम करायला हवे. धर्माचा अधर्मावर, न्यायाचा अन्यायावर व सद्गुणांचा अवगुणावर विजय म्हणजे विजयादशमीचा उत्सव होय. विजयादशमीला वैचारिक, धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या ही खूप महत्त्व आहे. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही धम्मचक्र परिवर्तन दिनासाठी याच दिवसाची निवड केली. 99 वर्षाच्या वाटचालीत संघाने या देशावर आलेल्या प्रत्येक संकटात, आपत्तीत निवारणासाठी सक्रिय सहभाग घेतला. त्या त्या परिस्थितीत समाजाला व देशातील प्रशासनाला संघाने मोठे सहकार्य केले. संघावर कितीही संकटे आली तरी स्वयंसेवकांनी संयमीपणे सातत्य ठेवत संघ काम सुरुच ठेवले. संघकाम वाढत राहिल्यावर संघाला प्रखर विरोध ही झाला संघावर बंदीचाही प्रयत्न झाला. कधीकाळी संघ कार्य दुर्लक्षित केले गेले परंतु दुर्लक्षित कार्य नंतर दखलपात्र झाले व आज कुतुहल पात्र झाले. आणि संघाबाबत विरोध असणाऱ्यांचे ही मते ही सकारात्मक झाली. आगामी काळातही देश विघातक शक्ती विरोधात लढण्यासाठी स्वयंसेवकांनी समाजात जागृती करावी. देश प्रगतीपथावर व बलशाली बनवण्यासाठी संघकार्यात सातत्य ठेवावे.
यावेळी सतीश गुगळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी विविध प्रात्यक्षिके झाली. या पथसंचलनावर शहरात विविध ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
आमदार मोनिका राजळे यांच्यासह शहरातील विविध मान्यवर उत्सवाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब पालवे यांनी सूत्रसंचालन चैतन्य पवार यांनी केले तर आभार अमोल भंडारी यांनी मानले.