पाथर्डी (प्रतिनिधी):- पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणे म्हणजे सुशिक्षितपणा नव्हे तर ते बुध्दीच्या दिवाळखोरीचे लक्षण आहे. हिंदू संस्कृतीचे रक्षण करणे व मुलींना संस्कार देणे आजच्या काळाची गरज बनली आहे. स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेवु नका. लव्ह जिहादचे संकट आता तुमच्या आमच्या घरापर्यंत पोहोचले आहे. ‘लव्ह जिहाद’ म्हणजे प्रेम नसून केवळ प्रेमाच्या जाळ्यात अडकवून सक्तीचे धर्मांतरण होय. तो गुन्हाच आहे. यापासून हिंदू मुलींसह त्यांच्या कुटुंबीयांनी सजग राहणे आवश्यक आहे, असा सल्ला सुप्रसिद्ध अधीवक्त्या ॲड. वर्षाताई डहाळे यांनी दिला.
पाथर्डी येथे हिंदू रक्षा युवा मंच आयोजित जागर स्त्री शक्तीचा आणि संस्कृतीचा या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी सुनिता उदबत्ते, भारती आसलकर, मेघाताई चिंतामणी, अंजली बंग आदिंसह शेकडो महिला व युवती उपस्थित होत्या. ‘लव्ह जिहाद’ची अनेक न्यायालयीन प्रकरणे ॲड. डहाळे यांनी हाताळली असून अनेक मुलींची त्यांनी सुटका केली आहे.
यावेळी डहाळे म्हणाल्या, “हजार-बाराशे वर्षांपूर्वीपासून ते आजपर्यंत भारतावर अनेक आक्रमणे झाली. आक्रमणे जमिनींवर झाली, मंदिरांवर झाली, धर्मावर झाली आणि महिलांवर झाली. पण आपण इतिहास विसरलो. काळाच्या ओघामध्ये आपला शत्रू कोण होता हे विसरलो.” या शत्रुंपासून आपले संरक्षण करणार्यांचे बलिदान, त्याग आपण विसरलो. आज कपाळावर कुंकू आणि अंगणात तुळस ज्या धर्मवीर संभाजीराजे व छत्रपती शिवाजी महाराजांमुळे सुरक्षित राहिली त्यांना घडवणाऱ्या मॉंसाहेब जिजाऊ यांचे संस्कार आपण विसरलो.
“हल्ली आक्रमणाची पद्धत बदललेली आहे. सध्या तुमच्यावर तलवारीने आक्रमण होत नाही, पण आपल्या घरातल्या शक्ती स्थानावर त्यांचे लक्ष आहे आणि ते म्हणजे आपली मुलगी आपली आई-बहीण. सुप्त पद्धतीने तुमच्या घरातल्या मुलींवर त्यांचे लक्ष आहे. संबंधित मुलीची कौटुंबिक पार्श्वभूमी तिच्या सवयी यावर लक्ष असते. असली संकटे आपल्या दारापाशी उभी आहेत. आपल्याच घरातील मुलगी जेव्हा ‘श्रद्धा वालकर’ होते तेव्हा आपल्याला जाग येते. ही वेळ येऊ नये म्हणून आपण जागरूक असणे आवश्यक आहे.” स्वातंत्र्यानंतरही स्त्री शक्तीला अबलाच म्हटल्या गेलं परंतु आपल्यातील स्त्री शक्तीला जागृत करा माता दुर्गेला म्हणजेच आपल्यातील स्त्री शक्तीला जागृत करा व आपल्या हिंदू संस्कृतीवर चालुन आलेल्या या महिषासुराचा नायनाट करा. आपला धर्म वाढविण्यासाठी इतर धर्मातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते. नंतर सक्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते व कार्यभाग उरकल्यावर तिचे पस्तीस पस्तीस तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवल्या जातात. ही वेळ आपल्या मुलीवर येवु नये म्हणून हिंदू समाज व एकत्र कुटुंब पद्धती व हिंदू संस्कृती सांभाळा वाढवा. तिचा अभिमान बाळगा. कुटुंबात वेळ द्या. मुलींना संस्कार व प्रेम देत त्यांच्या भावना समजून घ्या. महाराष्ट्राच्या संस्कारांने इथल्या मातृशक्तीने संपूर्ण देशालाच प्रेरणा दिली आहे. आम्ही जिजाऊ, अहिल्या, सावित्रीच्या लेकी आहोत त्यांना आपले आदर्श माना. परधर्मीयांची लोकसंख्या वाढली तर तुमचेही अस्तित्व संपणार आहे. त्यामुळे लव जिहाद सारख्या घटना आजुबाजुला जरी घडत असतील तर त्याचा विरोध करा.
लव्ह जिहादमध्ये फक्त सर्वसामान्य मुलीच फसतात, असे नाही तर उच्च शिक्षित क्षेत्रातील, ग्रामीण भागातील मुलीही फसत चालल्याने ही गंभीर बाब झाली आहे, असे सांगून त्यांनी ३६ वर्षांची आई व तिची १६ वर्षांची मुलगी विशिष्ट समाजातील एकाच तरुणाच्या जाळ्यात अडकल्याचा किस्सा कथन केला. हिंदू मुलींनी आपले आदर्श कोणते हे प्रथम लक्षात घ्यावे, म्हणजे फसवणूक होणार नाही, चित्रपट, मालिका पाहून करमणूक करण्यापेक्षा तेवढा वेळ मुलींना जाज्वल्य इतिहास सांगा. प्रसार माध्यमे व सोशल मीडियाचा अतिरेक टाळा.
“ज्या भूमीवर तुमचा जन्म झाला आहे तिथे मुलीला, स्त्रीला देवीचे स्थान आहे. नवरात्रीमध्ये आपण सजवलेल्या देवीकडे विद्या मागा, शक्ती मागा. स्वतः दुर्गा बना, सजग रहा आणि समाजामध्ये होणाऱ्या ‘लव्ह जिहाद’सारख्या वाईट प्रवृतींचा नायनाट करा,” असे आवाहन डहाळे यांनी केले.
प्रास्ताविक, स्वागत भारती आसलकर, परिचय सौ. लाटणे, सुत्रसंचलन कु. गायत्री साठे यांनी केले तर आभार सौ भंडारी मॅडम यांनी मानले.