पाथर्डी (प्रतिनिधी) :- पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना त्यांच्या सेवाभावी व आदर्श सेवेबद्दल नाशिकच्या शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्थेचा राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाला असून रविवारी (ता. ६) नगर येथे पुरस्कार वितरण समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. गेल्या आठ वर्षांपासून राज्य पोलीस दलात मुटकुळे यांनी सेवा करीत आहेत. ठाणे, चंद्रपूर ,नवी मुंबई, नाशिक विभागातील त्यांची कारकीर्द लक्षवेधी ठरली. सर्व धर्म समभावाची शिकवण देत समाजातील सर्व थरातील चांगल्या लोकांशी संवाद साधत सामाजिक शांतता सलोखा राखण्यात त्यांना मोठे यश मिळाले. मितभाषी, मनमिळावू व सर्वांना सहकार्याची भावना असल्याने त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे. कर्तव्याच्या बाबतीतही समाज विघातक प्रवृत्तींवर जरब बसवून उत्तम टीमवर्कच्या आधारे त्यांनी गुन्हेगारांवर सुद्धा तेवढाच दरारा ठेवला आहे गेल्या दीड दोन वर्षांपासून पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये प्रभारी अधिकारी म्हणून काम करताना पोलिसांमध्ये सांघिक भावना वाढवत सकारात्मक बनवले. शारीरिक तंदुरुस्ती राखत काम करणारा उत्साही पोलीस जवान राहावा म्हणून सायंकाळी खेळ, योग ,पहाटे फिरणे अशा गोष्टींचे महत्त्व पटवले. सध्या दररोज सायंकाळी उपस्थित पोलीस तासभर व्हॉलीबॉल चा खेळ खेळतात. कार्यालयाचा परिसर स्वच्छ करून घेत अंतर्गत रचना आकर्षक केली. अभ्या गतांसाठी स्वतंत्र चौकशी कक्ष, प्रलंबित कामांचा व तपास डायर्यांचा वेगाने निपटारा केला. पोलीस म्हणजे मित्र असा विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्यात विशेष प्रयत्न त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत. सर्व थरातील संपर्कामुळे गेल्या दोन-तीन महिन्यात अनेक सामाजिक तणावाचे प्रसंग मिटवण्यात पाथर्डी पोलिसांना यश आले. गणपती विसर्जनाच्या दिवशी तर जातीय दंगलीचा कट त्यांनी उधळून लावला. नवरात्र उत्सव, मढी यात्रा असे मोठे बंदोबस्त यशस्वी पार करत पोलीस दलाची मान उंचावली. अशा विविध अंगी कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. प्रथमच स्थानिक पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकाऱ्याला पुरस्कार मिळाल्याने नागरिकांनी सुद्धा जोरदार स्वागत केले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक सुनील पाटील आदींनी मुटकुळे यांचे अभिनंदन केले आहे.