पाथर्डी (प्रतिनिधी) : – आमचं बंड हे भाजपाच्या विरोधात नसून जे सर्व पक्ष व चिन्ह घेऊन आले व भाजपमध्ये राजे होऊ पाहत आहेत त्यांच्या विरोधात आहे. आमच्या दोघांपैकी किंवा प्रस्थापित घराण्यातील आडनाव सोडून दुसरा कोणीही उमेदवाराला भाजपाचं तिकीट मिळालं तरी त्याच्या विजयासाठी जिवाचं रान करू. सर्व सामान्य मतदार आमच्याच पाठिशी आहे, हे आज सिद्ध झालं आहे. आम्ही रात्रंदिवस सर्वसामान्यांसाठी लढलो आहोत. आम्हाला आमदार होण्यासाठी लढायचं नाही तर सर्वसामान्यांना वाली उरला नाही म्हणून लढायचं आहे. भाजपाची उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष उमेदवार म्हणून लढू. असा निर्धार भाजप नेते गोकुळ दौंड व अरुण मुंडे यांनी व्यक्त केला.
शहरातील विजय लॉन्स येथे आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यास उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. भाजपाचे शेवगाव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मेळाव्यास पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिता दौंड, शीतल केदार, बाळासाहेब सोनवणे, दीपक पाटील, बबन भुसारी, प्रल्हाद कीर्तने, बाबासाहेब भापकर, आत्माराम कुंडकर, विराज फाटके, भूषण देशमुख आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी, मुंडे-दौंड या भाजपाच्या जोडगोळीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत अप्रत्यक्षपणे आ. राजळे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले. दरम्यान, मुंडे व दौंड यांनी आजवर केलेल्या कामांच्या चित्रफितीही उपस्थित जनसमुदायास दाखवल्या गेल्या.
शेवगाव व पाथर्डी येथील मेळाव्यांस मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाचा हवाला देत दौंड व मुंडे म्हणाले, सर्वसामान्य कुटुंबात आमचा जन्म झाला. लोकनेते मुंडे साहेब व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे प्रेरणा मिळाल्याने आम्ही गेल्या २५ वर्षांपासून भाजपाचं काम निष्ठेने करत आलो आहोत. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही पक्षासाठी योगदान दिले आहे. त्यामुळे श्रेष्ठ नेतृत्वाला विनंती आहे की त्यांनी निष्ठावंतांना संधी द्यावी. ज्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली नाही त्यांना गेली १० वर्षे डोक्यावर घेतलं. सर्वसामान्यांना आमदारकीची संधी मिळेल म्हणून काही लोकांच्या पोटात गोळा आला आहे. पूर्वी राजाच्या पोटीच राजा जन्मायचा. तरीही त्याच्या पदरी प्रधानमंडळ असायचं. आता मात्र अख्खं प्रधानमंडळ एकाच घरातलं आहे. तरीही वरुन आमचीच लायकी काढली जाते. तुमचं भंगार ते आमचा संसार नसला तरी इथं जमलेली गर्दी हीच आमची खरी लायकी आहे. लायकी नसणाऱ्यांनी आपणाला आमदार केलं असलं तरी भविष्यातला आमदार तुमच्या आमच्या लायकीचा असेल, असं मुंडे यांनी राजळे यांचं नांव न घेता ठणकावलं. यावेळी विविध कामांसाठी द्याव्या लागणाऱ्या टक्केवारीची जंत्रीही त्यांनी उपस्थितांसमोर मांडली.
आजवर पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा पट उलगडून दाखवताना गोकुळ दौंड म्हणाले, आम्ही गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत पक्षासाठी काम करत आलो आहोत. २०१४ व २०१९ ला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी कष्ट घेतले. आम्ही पार्टीसाठी मेहनत घेतली आणि सत्ता मात्र दुसऱ्यांनी उपभोगली. असं असूनही ७० % लोक अजूनही ऊस तोडत असतील तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित करत दौंड यांनी राजळे व ढाकणे, घुले यांनी दीर्घकाळ उपभोगलेल्या सत्तेचा कालखंड उपस्थितांसमोर मांडला. मतदारसंघांतील प्रश्न तसेच असल्याचे सांगत स्वाभिमानाची ही निवडणूक लोकांनीच हाती घ्यावी असे आवाहन करत दौंड यांनी प्रसंगी अपक्ष का होईना परंतु उमेदवारी करणारंच असे ठामपणे सांगितले. तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्याची ही निवडणूक असल्याने यावेळी तुम्ही तुमचा स्वाभिमान व अभिमान विकू नका असे आवाहन दौंड यांनी शेवटी केले. बाळासाहेब कोळगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दीपक कुसळकर व विजय साबळे यांनी सूत्रसंचालन केले तर गुरुनाथ माळवदे यांनी आभार प्रदर्शन केले.
➡️विद्यमान आमदारांऐवजी निष्ठावंतांना तिकीट मिळावं म्हणून आज तुम्ही मोठी उपस्थिती नोंदविली आहे. आपण सारे मिळून सर्वसामान्यांसाठी सदैव तत्पर असलेल्या मुंडे व दौंड यांच्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागणार आहोत. दोघांपैकी कुणाही एकाला उमेदवारी मिळाली तरी आपण सर्वजण एकदिलाने काम करू.
तुषार वैद्य-शेवगाव तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी