पाथर्डी (प्रतिनिधी):- भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन शिक्षणव्यवस्थेत गुरु परंपरेला अनन्यसाधारण महत्व होते. गुरुंचे मोठेपण शब्दामध्ये कधीच मांडले जाऊ शकत नाही. जीवन जगण्याच्या संघर्षकाळात प्रत्येकाच्या पाठीमागे उभा राहणारा आईवडिलांनंतर गुरुच असतो. गुरूंच्या प्रत्येक कृतीतून आपण ज्ञानाचे अंश घेत असतो. गुरुंप्रती आदर व्यक्त करणारी गुरुपौर्णिमा ही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे असे प्रतिपादन श्री क्षेत्र भगवानगड येथील ह. भ. प. दादा महाराज शास्त्री यांनी केले. ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ बबन चौरे, डॉ अरुण राख, डॉ अशोक डोळस, प्रा. ब्रम्हानंद दराडे, प्रा. शरद बोडखे उपस्थित होते.
दादा महाराज शास्त्री म्हणाले, स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडविणारे त्यांचे गुरु परमहंस होते. ज्ञानेश्वरीमध्ये प्रचंड अशी वैचारिक ताकद असून ज्ञानेश्वरीचा अभ्यास आज संशोधक करत आहेत. महाभारत नंतरच्या काळात भारतामध्ये ज्ञानपरंपरा खंडीत झाली. आजच्या ग्रंथांमध्ये वैचारिकता कमी असून आज आपण जे शिकतो ते जीवन जगण्यासाठी किती उपयुक्त आहे हाच खरा संशोधनाचा विषय आहे. आज जगाला घडविणारा हा ज्ञानी वर्गच असून जगाला अधोगतीकडे नेणाराही ज्ञानी वर्गच आहे. आपले ज्ञान हे जगाला समृद्ध करणारे असावे हा मानणारा खरा गुरुवर्य होय असे ते शेवटी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ बबन चौरे, पाहुण्यांचा परिचय प्रा. अजित पालवे, सुत्रसंचालन प्रा. शरद बोडखे तर आभार प्रा. ब्रम्हानंद दराडे यांनी मानले.