पाथर्डी (प्रतिनिधी): पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर या शाळेने आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते या बालदिंडी सोहळ्या मध्ये लेझीम पथकाने विविध थरारक प्रात्यक्षिके सादर करून पाथर्डीकरांचे लक्ष वेधले.
पाथर्डी शहरातील श्री विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर या शाळेने शिस्तबद्ध व आकर्षक बालदिंडी सोहळ्याचे आयोजन करून बालदिंडी सोहळ्यातून विविध समाज उपयोगी व पर्यावरण पूरक संदेश दिला.
बालदिंडी सोहळा कै. माधवराव निराळी खुले सभागृह या ठिकाणी सुरुवात झाली. पालखीचे पूजन ह.भ.प.माधवबाबा यांनी केले याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष एडवोकेट सुरेशराव आव्हाड, समन्वयक ज्ञानेश्वर गायके,प्राथमिक मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी व बहुसंख्येने पालक बंधू- भगिनी तसेच पाथर्डी शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड म्हणाले, की शाळेत बालदिंडीचे आयोजन केल्याने विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख होण्यास मदत होते त्यासाठी शाळेतील बालदिंडी सोहळा एक महत्त्वाचे माध्यम म्हणून उपयुक्त ठरत आहे.तसेच विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या जडणघडणीत विविध संतांनी समाज प्रबोधन करून अध्यात्मिक व वैज्ञानिक ज्ञानाची भर घालून प्रत्येक मानव जातीला जगण्यास आधार प्राप्त करून दिला तसेच आध्यात्मिक ज्ञानामुळे मनुष्याच्या जीवनात स्थिरता प्राप्त होते असे यावेळी सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष एडवोकेट सुरेशराव आव्हाड यांनी सर्व बालवारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
मृदुंग-टाळ ,विविध संतांची आकर्षक वेशभूषा, डोक्यावर तुळस, वारकरी झेंडे,लेझीम पथक तसेच विविध पर्यावरण पूरक फलक इत्यादी घेऊन निघालेले बालवारकरी बालदिंडी सोहळ्याचे आकर्षक केंद्रबिंदू ठरले. शाळेतील मुलींच्या लेझीमपथकातून विविध आकर्षक प्रात्यक्षिकेचे सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
बालदिंडी सोहळ्यासाठी विद्यालयातील एकूण ५२७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी दिंडी सोहळ्यास उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
यावेळी बालदिंडी सोहळ्यासाठी क्रीडा शिक्षक रावसाहेब मोरकर, जयश्री एकशिंगे, मनीषा गायके,राधिका सरोदे,आशा बांदल, ज्योती हम्पे, कीर्ती दगडखैर, विद्या घोडके, ज्ञानेश्वरी मुऱ्हे,दीपक राठोड, प्रमोद हंडाळ,विठ्ठल धस, ऋषिकेश मुळे,आदिनाथ फाजगे यांनी परिश्रम घेतले.