पाथर्डी (प्रतिनिधी):- शहरातील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी विठू नामाचा गजर करीत आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करत ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पालखीत श्री.विठ्ठल- रूख्माईची प्रतिमा व शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके ठेवण्यात आली होती. पंढरीची वारी ही ईश्वरी प्रेमाची एक विलक्षण अनुभूती आहे. वारी ही साधना असून दिंडी हे एक साधन आहे. सातत्य,नियमितपणा व सामूहिक भक्ती ही वारीची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
शालेय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक वारशाची जाण व्हावी. पंरपरा व संस्कृती याची माहिती असावी त्याचबरोबर दिंडीतील सर्वांच्या सहभागातून धार्मिक सलोखा व धर्मनिरपेक्षता या संविधानात्मक तत्वांतून राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण व्हावी व त्यांच्यात अंगीभूत असणारी उपक्रमशीलता वाढीस लागावी या हेतूने आषाढी एकादशीनिमित्त या दिंडीचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्याध्यापिका नंदा तुपे यांनी सांगितले. पालखी सोहळ्याद्वारे समाजाशी जवळीक वाढावी व संत परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने दिंडी काढीत शाळेतील बालवारकऱ्यांनी अवघे गाव भक्तिमय व ज्ञानमय केले. पावसातील सर्वांच्या उत्साहाने अवघा परिसर भक्तीमय झाला होता. या सोहळ्यासाठी मुख्याध्यापिका नंदा तुपे, रत्नप्रभा महांडुळे, शिक्षिका सीमा निकाळजे, अनुराधा निऱ्हाळी, लता कोकाटे, अर्चना खाडे, शोभा फुंदे, वैशाली जायभाय, सुरेखा बडे, ज्योती जाधव, भावना देवरे, मनीषा फटांगरे, मीना ठोंगीरे, शिला नागरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमासाठी शिक्षणाधिकारी अनिल भवार, विस्तार अधिकारी रामनाथ कराड, केंद्रप्रमुख रामदास गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेपासून निघालेल्या या दिंडीत प्रारंभी भगवा ध्वज घेऊन नाचणारे बालवारकरी, त्यांच्यामागे विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिरुपातील विद्यार्थी,नंतर टाळकरी,मध्येच मृदंगवादक,विणेकरी व डोक्यावर ग्रंथ ,तुळशी व रोपे घेऊन आलेल्या बालिका वारकरींसह सर्व विद्यार्थी गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरा जवळ ही दिंडी स्थिरावली. यानंतल बालवारकऱ्यांना खाऊ वाटप केला गेला.