spot_img
spot_img

पाच किलोमीटर अंतर वारकऱ्यासोबत चालत माजी आ. भिमराव धोंडे यांचा गहिनीनाथ गडाच्या दिंडीत सहभाग

आष्टी ( वार्ताहर):-विठ्ठल नामाचा गजर करीत गहिनीनाथ गडाचा पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ होत आहे. करमाळा तालुक्यातील वरकुटे येथून आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे शनिवारी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले, हातात टाळ, डोक्यावर टोपी परिधान करीत पाच किलोमीटर अंतर दिडींत वारकऱ्यासोबत चालत पाच तास दिंडीचा आनंद घेतला.

ओम चैतन्य श्री गहिनीनाथ महाराज व प्रात स्मरणीय श्री संत वामनभाऊ महाराज पादुका पालखी सोहळ्याचे श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ते श्री क्षेत्र पंढरपुरकडे ६ जुलै रोजी प्रस्थान झाले.
भगव्या पताका हातात घेऊन विठ्ठल नामाचा गजर करीत पालखी पंढरीकडे मार्गस्थ होत आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठा समजला जाणारा श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या पायी दिंडी सोहळा वाहली, सावरगाव, वनवेवाडी , मातकुळी मैदान, जामखेड,सारोळा,खुरदैठण, घोडेगाव, आपटी, पिंपळगाव उंडा, चिंचपुर, तांदळवाडी, देऊळगाव, मिरगव्हाण, सालसे, वरकुटे, भोगेवाडी,पिंपळखुंटे , अंबड,बार्डी, जाधववाडी , पवार वस्ती पाटा,मेंढापुर पाटील वाडा मार्गे पंढरपूर कडे जात आहे. दिंडीत प्रचंड संख्येने वारकरी सहभागी झाले आहेत. ३५० ते ४०० चारचाकी वाहनांचा ताफा दिंडी सोबत दिमतीला आहे.

मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील गाव, वाडी, वस्त्यामधून हजारो वारकरी राष्ट्रसंत वामन भाऊंचे दिंडीत सहभागी झाले आहेत. संत वामन भाऊ महाराज यांनी या पालखीची सुरुवात सुमारे १३१ वर्षापूर्वी केली होती. आजही हि परंपरा सुरु आहे. बीड,अहमदनगर , संभाजीनगर व मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यातील  वारकरी  सहभागी  होतात. शिस्तबद्ध आणि सर्व समावेशक असलेल्या दिंडीचे नियोजन या गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. काही वृद्ध वारकरी चालुन थकल्यावर त्यांना बसण्यासाठी चारचाकी वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच वारकरी आजारी पडल्यास त्यांना वैद्यकीय सेवा पुरविण्याची सोय देखील आहे. रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी वारकरी महिला फुगडी तर पुरुषांनी कुस्ती व कबड्डी खेळत वारीचा आनंद घेतला. माजी आमदार भीमराव धोंडे हे जवळपास पाच तास गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री व वारकऱ्यांच्या सोबत होते. तसेच रिंगण सोहळ्याचा आनंद त्यांनी घेतला. पालखी सोहळ्याचे दर्शन घेत आठरे येथे झालेल्या अश्वांच्या रिंगण सोहळ्यात माजी आमदार भीमराव धोंडे यांनी वारकऱ्यांच्या सोबत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. सोमवारी दिनांक १५ जुलै रोजी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या वतीने गहिनीनाथ गडाच्या दिंडीतील लाखो वारकऱ्यांसाठी महापंगत देणार आहेत महापंगतीच्या प्रसादाचा वारकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!