पाथर्डी (प्रतिनिधी):- विविध प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आजपासून चार टप्प्यात आंदोलन पुकारले असुन संघटनेच्या वतीने तहसीलदार उद्धव नाईक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. हे आंदोलन चार टप्प्यात होणार असून आज कर्मचाऱ्यांनी शासनाचा निषेध व्यक्त करत काळ्या फिती लावून कामकाज केले.
यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अक्षय फलके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र आंधळे, संघटक दिपक कदम, नितीन मुळे, तालुकाध्यक्ष दिपक मिरपगार, उपाध्यक्ष दिपक कदम, चिटणीस दादासाहेब वावरे, शंकर भडके, श्रीमती जे.बी.अकोलकर यांच्यासह सर्व महसूल विभाग कर्मचारी उपस्थित होते.
या आंदोलनातील दुसऱ्या टप्प्यात ११ जुलै रोजी सरकार विरोधात दुपारी सुट्टीच्या वेळेत निदर्शने करण्यात येणार असून तिसऱ्या टप्प्यात लेखनी बंद आंदोलन तर १५ जुलै पासून काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
प्रलंबित दांगट अहवाल लागू व्हावा, रिक्त पदे तातडीने भरावीत, लिपिक/टंकलेखन पदाचे नामकरण ‘महसूल सहायक’ करावे, कारकून हे नाव बदलण्यात यावे, अव्वल कारकून, मंडलाधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार पदावर पदोन्नती मिळावी, वेतन देयके वेळेवर मिळावीत यांसह विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्या मागण्यांचे पत्र राज्य सरकारकडे देण्यात आले असून त्यावर तातडीने व गांभीर्याने विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी हे आंदोलन असुन राज्यस्तरावरील या आंदोलनात जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सर्व कर्मचारीही सहभागी झाले आहेत.
चौकट – राज्य सरकारची बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पूर्ण क्षमतेने सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात १ नायब तहसिलदार, २ अव्वल कारकुन, २ महसूल सहाय्यक, १ उपलेखापाल ही पदे मंजुर करुन त्यांचेतर्फे सदर योजना कार्यान्वीत करणे आवश्यक आहे. तोपर्यंत सदर योजनेचे कामकाज सुरु होणेकामी महिला व बाल विकास विभागाकडील बालविकास प्रकल्प अधिकारी / पर्यवेक्षीका/ अंगणवाडी सेविका / मदतनिस तसेच जिल्हा परिषदेकडील महिला व बाल विकास विभागाडील सक्षम कर्मचारी व अधिकारी यांची नियुक्ती सदर योजनेचे अंमलबजावणीसाठी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून सदयस्थितीत महसूल विभागातील 35% ते 40% पद रिक्त आहेत. जोपर्यंत वरील प्रमाणे कर्मचारी उपलब्ध होणार नाहीत तोपर्यंत महसूल विभाग पूर्ण क्षमतेने सदर योजनेचे काम करु शकनार नाही त्यामुळे आम्ही नम्रपणे सदर योजनेचे कामकाज नाकारत आहोत. – महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना अ.नगर.