आष्टी (प्रतिनिधी)भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या लोकसभेतील पराभवानंतर त्यांना विधानपरिषदेत संधी मिळणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती . आज अखेर भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतील वरिष्ठांनी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांची नावे समाविष्ट आहेत.
पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याचे कळताच देवळाली सह आष्टी तालुक्यासह जिल्ह्याभरात फटाक्याची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला. भाजपमध्ये विधान परिषदेसाठी अनेक जण इच्छूक होते अखेर विधान परिषदेसाठी भाजपने पाच जणांची नावे जाहीर केली आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत झाली होती त्यांचा अल्पशा मताने पराभव झाला होता. केंद्रामध्ये भाजपचं सरकार येणार आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार हे निश्चित होतं परंतु त्यांचा निसटता पराभव झाल्याने पक्षातील नेत्यासह कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता त्यांच्या पराभवाने खचून चार कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पंकजा मुंडे या कणखर नेत्या म्हणुन ओळखल्या जात असल्याने राज्यभरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पंकजा मुंडेंना मंत्रीपद दिल्यास भारतीय जनता पार्टीची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसू शकते अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.