बीड(प्रतिनिधी)योग दिन’ साजरा करण्याचे कारण…
जगभरात योगाचा प्रसार करण्यासाठी आणि त्याच्या फायद्यांची जाणीव करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व सांगितले होते. ‘‘योग ही भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योग मन व शरीर, विचार व कृती, संयम व पूर्णता, मनुष्य व निसर्ग यांच्यातील ऐक्याला मूर्त रूप देतो. आरोग्य व स्वत:च्या कल्याणसाठी सर्वांगीण दृष्टिकोन प्राप्त करून देतो. योगासने हा केवळ एक व्यायाम नाही, तर स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा मार्ग आहे. आपली जीवनशैली बदलून आणि चेतना निर्माण करून आरोग्य सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन स्वीकारण्याच्या दिशेने काम करूया,’’ पंतप्रधानांच्या या भूमिकेनंतर संयुक्त राष्ट्रांतील विविध देशांनी योगांचे महत्त्व जाणून हा दिवस साजरा करण्यास मान्यता दिली.
➡️ २१ जून हाच दिवस का निवडला?
२१ जून या दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यासाठी निवडण्यामागे खास कारण आहे. २१ जून हा वर्षांत सर्वात मोठा दिवस मानला जातो, ज्याला ‘उन्हाळी संक्राती’ असे म्हटले जाते. उन्हाळी संक्रांती हा उत्तर गोलार्धातील सर्वात जास्त प्रकाश असलेला दिवस आहे. पृथ्वीचा अक्ष त्याच्या कमाल कोनात सूर्याकडे झुकतो, त्यामुळे दिवस मोठा होतो. २१ जूननंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो. योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खूप खास मानला जातो. त्यामुळे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.