पाथर्डी (प्रतिनिधी):-तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात गौरवशाली इतिहास असणाऱ्या संस्थेच्या स्थापनेला मागील वर्षी १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या शतकोत्तरी संस्थेच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे विवीध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाने रोवले गेले आहेत. त्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा आजच्या विद्यार्थ्यांनी घ्यावी व नवनवीन विविध क्षेत्र पादाक्रांत करत उज्ज्वल यश मिळवावे असे प्रतिपादन श्री तिलोक जैन विद्यालयाचे पर्यवेक्षक अजय भंडारी यांनी केले.
शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयात
नुतन शैक्षणिक वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व नवीन पाठयपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक दौंड, पर्यवेक्षक फकीर सर, ग्रंथपाल बाचकर सर, डॉ.अनिल पानखडे, पालक व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना प्रा.डॉ. अशोक दौंड म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मनात भीती, न्युनगंड न बाळगता नवनवीन विषय अभ्यासावेत. मनातील शंका शिक्षकांसमोर व्यक्त कराव्यात. शिक्षण व अभ्यासा बरोबरच शारीरिक व मानसिक क्षमता ही वाढवावी. स्वच्छता, शिस्त हे गुण अंगी बाळगावेत. आपल्या विद्यालयाला एक वेगळी परंपरा आहे. तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या विद्यालयाचा नावलौकिक कसा वाढेल याकडे शिक्षकांसह विद्यार्थी व इतरांनी लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय सर्वतोपरी प्रयत्न करीत असते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पानखडे, स्वागत श्रीमती मुथ्था मॅडम यांनी केले तर आभार मरकड सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजिंक्य कांकरिया व सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.