देऊळगाव घाट (प्रतिनिधी).लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपा नेत्या, पंकजाताई मुंडे यांचा निसटता पराभव झाल्याच्या दुःखात आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी गावचे पोपटराव मधुकर वायभासे या तरुणांनी आत्महत्या केली होती. काल दिनांक१४ जून रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी वायभासे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतात, मात्र या विवंचनेतून कोणी आपला जीव गमवावा ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब आहे. कुटुंबासाठी देखील हे कधीही न भरून निघणारे मोठे दुःख आहे. त्यामुळे संयमाने जय पराजय घ्यावेत. कोणतीही निवडणुक अंतिम नसते. कोणीही टोकाचा निर्णय घेऊ नये. अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान मयत पोपट वायभासे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मुलगा व मुलगी यांच्या नावावर पाच लक्ष रुपयांची एफडी केली आहे व पत्नी यांना खाजगी कंपनी नोकरी देण्याचे जाहीर केले आहे.
यावेळी जि.प सदस्य सुरेश माळी,म्हसोबावाडीचे सरपंच शिवाजी शेकडे, देऊळगाव घाटचे सरपंच राम ठोंबरे,उपसरपंच आदिनाथ वायभासे, प्रदीप वायभासे, कारखेलचे मा.उपसरपंच सचिन घुले, युवराज वायभासे, विलास वायभासे, बाबा वनवे, संतोष वायभासे, सचिन वायभासे, गणेश वायभासे, दिगंबर ठोंबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.