पाथर्डी (प्रतिनिधी):-अनेक वर्षांच्या कालखंडानंतर मृग नक्षत्राच्या प्रारंभी शहरासह तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यात आठ ते दहा टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. एकूण 107 टँकर पैकी पंधरा गावांचे पाणी टंचाईचे टँकर बंद करण्यात आले आहेत. पावसाचे प्रमाण या आठवड्यामध्ये सलग राहिल्यास सर्व टँकर बंद होतील असे पंचायत समिती प्रशासन कडून सांगण्यात आले. बियाणे व खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी तालुका कृषी विभागाने प्रत्येक दुकान निहाय पथके तैनात करून त्यांचे चित्रीकरण केले जात आहे. सन २०१८ साली मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात पाऊस पडला होता मात्र आद्रा नक्षत्रा नंतर पावसाने दडी मारली होती यंदा मात्र हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार सर्वत्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे. त्याची प्रचिती पाऊस वेळेवर व समाधानकारक सुरू झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून यंदा मुग उडीद तुर कडधान्य व कपाशीच्या पिकामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण ऊस पिकाला जास्त पाणी लागून दुबार दुसरे पीक घेता येत नाही. कडधान्य व कपाशी नंतर कांदा पिकासह भाजीपाला घेऊन दुबार पेरणी करता येते. अपेक्षेप्रमाणे यंदा बाजरीच्या क्षेत्रातही वाढ होणार असून मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे धान्य हातात नव्हते. त्यामुळे खाण्यापुरते धान्य किमान घरात असावे अशी शेतकऱ्यांची भावना वाढून अन्नधान्य पिकासाठी सुद्धा शेतकरी सरसावला आहे. तालुक्यात एकूण २४८०० हेक्टर क्षेत्र कडधान्य लागवडीसाठी उपलब्ध असून बेचाळीस ४२१०० हेक्टर क्षेत्र खरीप अन्नधान्य साठी उपलब्ध आहे. याबरोबरच साडेचार हजार हेक्टर क्षेत्र खरीप गळीत धान्य साठी उपलब्ध असून त्यानुसार कृषी खात्याने नियोजन पूर्ण केले आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे विविध मंडलाधिकारी ,सहाय्यक अधिकारी कर्मचारी सर्वजण कार्यक्षेत्रावर कार्यरत असून शेतकरी, विक्रेते व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याशी संपर्कात आहेत. शेतकऱ्यांनी कपाशीच्या एकाच वाणांच्या आग्रह धरू नये. मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे आकारले जात असतील तर तात्काळ मंडलाधिकारी, कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जादा भावाने बियाणे व खते विकणे व अप्रमाणित बियाणे विकणे आदी प्रकारांची गंभीर दखल घेऊन कारवाई केली जाईल. असा इशारा तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे व कृषी अधिकारी सुनील देखणे यांनी दिला आहे. सर्वच खतांच्या दुकानावर दर तासाला विविध कर्मचारी भेट देऊन तेथूनच सेल्फी फोटो काढून कार्यालयाला पाठवतात. त्यामुळे तक्रारीला वाव नाही. मान्यता पात्र विक्रेत्याशिवाय शेतकऱ्यांनी अन्य कोठूनही बियाणे घेऊ नये. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता शिंदे यांनी व्यक्त केली. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक टंचाई ग्रस्त भाग म्हणून पाथर्डी तालुक्याकडे बघितले जात होते. एकूण 107 टँकरद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत होता. आणखी आठ दिवस पाऊस आला नसता तर पाणी आणायचे कुठून असा प्रश्न प्रशासनाला पडला होता. ठेकेदाराच्या मनमानीमुळे लाभार्थी व पंचायत समिती प्रशासनाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागून त्यामुळे मोठी आंदोलने सुद्धा टंचाई काळात झाली.” पावसाचे आगमन वेळेवर झाल्याने विशेष आढावा पथक कार्यरत असून जेथे पाऊस पडतो तेथील माहिती घेऊन ग्रामपंचायत कडून पत्र घेतले जाते व टँकर बंद केला जातो आज चिचोंडी, कोल्हार या पट्ट्यात पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. हाच विभाग सर्वाधिक टंचाईग्रस्त होता. त्यामुळे तेथील टँकर सुद्धा आढावा घेऊन बंद करू” अशी माहिती गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी दिली. समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाच्या बाबतीत बळीराजाच्या अपेक्षा खूप वाढले असून जिल्हा बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांनी कर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अत्यंत गतिमान पद्धतीने राबवावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आज पर्यंत तालुक्यात दीडशे मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे..