पाथर्डी प्रतिनिधी :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणास बसलेले मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मूळ गाव मातोरी पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर पाथर्डी तालुक्यात कीर्तन वाडी येथे गेल्या सात दिवसांपासून उपोषणास बसलेले प्रल्हाद कीर्तने यांनी वेगळीच भूमिका मांडत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये व सगेसोयऱ्यांचा अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या खरवंडी परिसरात सर्वपक्षीय रास्ता रोको व बंदचे आवाहन करण्यात आले आहे. काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड. प्रताप ढाकणे, तालुक्यातील ओबसी समाजाचे प्रमुख नेते यासह ओबीसी आंदोलनाचे समन्वयक समता परिषदेचे रमेश गोरे, मुख्य संयोजक दिलीप खेडकर, सामाजिक कार्यकर्ते ॲड. हरिहर गर्जे आदींनी भेट देत कीर्तने यांच्या भावना जाणून घेतल्या. आज दुपारी प्रांताधिकारी प्रसाद मते व अन्य महसूल अधिकाऱ्यांनी कीर्तने यांची भेट घेऊन आंदोलनातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोडगा निघू शकला नाही. आंदोलनाची व्याप्ती मराठवाड्यासह नगर जिल्ह्यात करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार आहे. त्या दृष्टीने कार्यकर्ते संपर्क अभियानात सुरू झाली असून संभाजीनगरचे नेते बाळासाहेब सानप यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. किर्तन वाडी चा परिसर भगवान गडाच्या परिसरात येत असून या परिसरात ऊस तोडणी कामगारांचे अधिक्य आहे लोकनेत्या पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग या पट्ट्यात असून आंदोलकांच्या प्रतिनिधींनी आंदोलन स्थळी पंकजा मुंडे यांनी भेट द्यावी म्हणून त्यांच्याशी संपर्क साधला आहे. प्रांताधिकारी प्रसाद मते प्रभारी तहसीलदार प्रशांत सागडे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी भेट घेऊन ग्रामस्थ व उपोषणार्थींबरोबर चर्चा केली येत्या बुधवारपासून कीर्तने यांनी पाणीसुद्धा ग्रहण न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.