पाथर्डी (प्रतिनिधी):- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मनात कोणताही न्युनगंड न बाळगता कायम प्रयत्नशील रहावे. अपार मेहनत व एकाग्रतेने अभ्यास केल्यास जिवनात यश हमखास मिळते. काही प्रयत्नात पदरी अपयश आले तरी खचुन न जाता ध्येयाने प्रेरित होऊन प्रयत्न करावा. असे प्रतिपादन पाथर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लिमकर यांनी केले.
आज शहरातील एम एम निऱ्हाळी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त सिद्धेश ढाकणे, प्राचार्य संजय घिगे, समन्वयक सुखदेव तुपे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना लिमकर म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांनी हतबल न होता पुढील वर्षी अधिक प्रयत्न करून पारितोषिक मिळवावे. प्रयत्न केल्यावर जगामध्ये कुठली गोष्ट अशक्य नाही.शेवटी यश हमखास मिळते. “वाळूचे कण रगडीता तेलही गळे” ही म्हण याच अर्थाने आपल्या कडे रुढ असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे कौतुक करत पाथर्डी तालुक्यातील सर्वात जास्त विद्यार्थी हे पोलीस भरतीत उत्तीर्ण होऊन पोलीस सेवेत रुजू झालेली आहेत तसेच शासनाच्या विविध खात्यांत काम करत असल्याचे त्यांनी आर्वजुन सांगितले. परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवत असते. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करावा व आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरे जावे असे आवाहन शेवटी लिमकर यांनी केले.
यावेळी पर्यवेक्षक दत्तात्रय लवांडे, सौ.भाग्यश्री वाकडे, पी. टी. बांगर, राजेंद्र डागा आदी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय घिगे, सूत्रसंचालन राधाकिसन कोठे, स्वागत छाया नि-हाळी यांनी केले तर विष्णुपंत बुगे यांनी आभार मानले.