मुंबई (प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र काढावे अशी इच्छा महाराष्ट्रमध्ये प्रत्येक माणसाला एकदा तरी होते. विशेषता लहानपणी प्रत्येक जण एकदा तरी शिवाजी महाराजांचे चित्र काढतोच. पाटीवर ,वहीवर, पुस्तकावर, भिंतीवर वा कुठेही शिवाजी महाराजांचे चित्र काढल्याशिवाय मराठी मुलांचे बालपण साजरे होतच नाही. मग ते जातीवंत चित्रकार असतील …त्यांचे रंग आणि कुंचले महाराजांना विसरणे अशक्यच. शिवाजी महाराजांचे एखादे तरी चित्र न काढलेला लहान मोठा चित्रकार निदान महाराष्ट्रात तरी मिळणारच नाही. जगामध्ये अनेक कलाकारांनी रांगोळी. कोलाज. वाळू शिल्प अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून अनेक रेकॉर्ड केलेले आहेत असाच एक अनोखा उपक्रम रेकॉर्ड भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मुंबई शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारलेला आहे. दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने 25 तासांमध्ये 25000 शब्दात सुमारे 12 बाय 16 फूट या साईज मध्ये शिवरायांची प्रतिमा भारती विद्यापीठ प्रशालेचे उपक्रमशील कलाशिक्षक श्री नरेश लोहार यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी त्यांच्या लेखणीतून लिहून काढली असून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा केला आहे . आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराज या पुस्तकाच्या आवृत्ती मधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रसंग विद्यार्थ्यांनी व कलाशिक्षक नरेश लोहार यांनी लिहिले आहेत हा आगळा वेगळा उपक्रम नवी मुंबई परिसरामध्ये व महाराष्ट्रामध्ये प्रशंसनीय झाला आहे. विद्यार्थ्यांना कलेबरोबर त्यांचे हस्ताक्षर सुधारणे व छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे हा त्यापाठीमागील उद्देश आहे . या अनोख्या उपक्रमामध्ये नूतन मिसाळ, गणराज येशी, आर्यन वंडाळे ,अर्पिता पाटील, निकिता सातपुते, स्वरांजली प्रबळकर, रिंकल कातकरी, अनुष्का चिखले वैष्णवी पाटील, अश्विनी पाटील, सृष्टी बळीप, राधिका इंगळे या विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर हस्ताअक्षरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रसंग स्वतः लिहिलेले आहेत.
याही अगोदर कलाशिक्षक नरेश लोहार यांनी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात अमरापूर येथे 90 किलो तांदळाच्या माध्यमातून 17 बाय 28 फुटाची शिवरायांची प्रतिमा साकारलेली होती .तसेच ८बाय ६ या साईज मध्ये शिवरायांची कोलाज प्रतिमा साकारलेली होती .या अनोख्या उपक्रमाबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार विश्वजीत कदम तथा बाळासाहेब भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाच्या अध्यक्षा विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब, शालेय शिक्षण विभाग संचालक श्री एम डी कदम सर ,नवी मुंबई विभागाचे संचालक श्री विलासराव कदम सर, प्राचार्य श्री बेल्लम आर टी, उपप्राचार्य श्री आर एच कदम यांनी अभिनंदन केले आहे.