spot_img
spot_img

तरुणांनो, नियोजन, जिज्ञासा ठेवा यशस्वी व्हाल : प्रा.नितीन बानगुडे

आष्टी : (प्रतिनिधी)साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी नियोजन काय असते हे अखंड देशाला दाखवून दिले होते. नियोजनाशिवाय कोणताही माणूस होऊ शकत नाही त्याचबरोबर जिज्ञासा ठेवली तर आपण नक्कीच स्वराज्य निर्माण करू असा विश्वास महाराजांना होता. त्याच प्रकारचे नियोजन आजच्या तरुणांनी जर ठेवले तर आजचा बिघडत चाललेला तरुण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असे मत शिवचरित्रकार प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले.
कडा येथे शिवमहोत्सवानिमित्त व्याख्यानमालेमध्ये प्रथम पुष्प गुंफतांना प्रा. बानगुडे बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी नैतिक मूल्यावर आधारित राजकारण केले. महाराजांकडे प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका होती सगळ्यांना सोबत कसे आणायचे याचे उत्कृष्ट नियोजन त्यांनी त्याकाळी केले. अठरापगड जातींना एकत्र आणून स्वराज्य निर्माण करून अखंड देशाला त्याकाळी एक वेगळा संदेश दिला. यासाठी त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने संघटन व नियोजन करून स्वराज्याची गुढी उभारली. आज देशामधील तरुण भरकटत चालला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे आजच्या तरुणांकडे नियोजन नाही. त्याकाळी कणभर मराठ्यांनी मनभर मुघल शाही उध्वस्त करण्याचे काम केले ते केवळ फक्त नियोजन आणि जिज्ञासा यामुळेच. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले स्वप्न आजच्या युवकांनी पूर्ण करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी पालकांची भूमिका ही महत्त्वाची आहे. पालकांनी आपल्या मुलाचे कौतुक करण्यापेक्षा त्यांच्या चुका शोधा तरच आजची तरुणाई यशस्वी होईल. त्यासाठी तरुणांनो छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केल्यास नक्कीच आपल्या जीवनाची व समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा तरुण हा जिज्ञासा ठेवत नाही. जिज्ञासा न ठेवल्यामुळे अनेक ठिकाणी तरुणांना अपयशाला तोंड द्यावे लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिज्ञासा ठेवली होती तीच जिज्ञासा त्यांनी पूर्ण करून स्वराज्य निर्माण करून रयतेला सुखी ठेवण्याचे काम केले. आजच्या युवकांनी ध्येय समोर ठेवून काम करा. ध्येय जर समोर नाही ठेवले तर तुम्हाला कुठल्या दिशेला जायचे आहे हे कळणारच नाही.त्यासाठी आत्मविश्वासाने ध्येय तयार करा आणि कामाला सुरुवात करा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. जोपर्यंत ध्येय ठेवत नाही तोपर्यंत आजची तरुणाई यशस्वी होणार नाही हे उदाहरणासह प्रा. नितीन बानगुडे यांनी पटवून दिले. यावेळी कडा व परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कडा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने उत्कृष्ट असे नियोजन करण्यात आले होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!