पाथर्डी प्रतिनिधी :- नगर येथे येत्या शनिवारी (३ जाने.) होणाऱ्या ओबीसी समाजाच्या एल्गार मेळाव्यास तालुक्यातील हजारो समाज बांधव उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात येऊन सर्व समाज बांधवांनी बाजार तळावरून एकत्रितपणे दुपारी नगर येथे निघावे. समाजातील सक्षम कार्यकर्त्यांनी जाण्यासाठी वाहने उपलब्ध करून द्यावीत. असे आवाहन समता परिषदेचे उपाध्यक्ष अंबादास गारुडकर यांनी केले.
नगर येथे होणाऱ्या एल्गार मेळाव्या संदर्भात गोरे मंगल कार्यालयात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या नियोजन बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे विभागीय प्रदूषण आयुक्त दिलीपराव खेडकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून संयोजक रमेश गोरे, बंडू भांडकर, रणजीत बेळगे, सुरेश आव्हाड, भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड, नाभिक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, शिवसेनेचे भगवान दराडे व विष्णुपंत ढाकणे, भाजपचे जेष्ठ नेते अशोक गर्जे, दिनकर पालवे अँड. हरिहर गर्जे, सुनील पाखरे, बंजारा सेनेचे आर. के. चव्हाण, वंचित तालुकाध्यक्ष रविंद्र उर्फ भोरू म्हस्के, योगेश रासने आदींसह सर्व पक्षातील ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते. विविध कार्यकर्त्यांनी वाहनांची संख्या जाहीर केली त्याची एकत्रित बेरीज 300 हून अधिक होते. ही सर्व वाहने बाजार तळावरून शनिवारी दुपारी निघतील. माणिकदौंडी, मीरी, करंजी, चिचोंडी असा भाग स्वतंत्रपणे मेळाव्यासाठी येणार आहे. यावेळी बोलताना दिलीप खेडकर म्हणाले, ओबीसींचे अधिक्य असलेला तालुका आहे. सक्षम बांधवांनी सढळ हाताने मदत करावी. सत्तेच्या व पदाच्या माध्यमातून स्थिरावलेल्या समाज बांधवांनी तन-मन धनाने मेळाव्यासाठी सहकार्य करावे. गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत ओबीसी ब्रिगेड स्थापन होऊन हक्काचे संरक्षण व्हावे. मोठ्यानेत्यांनी तळ्यात मळ्यात भूमिका सोडून द्यावी. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्ते सैरभैर होतात.आंदोलने, मोर्चे न्यायालयात दाद मागणे असे टप्पे करावे लागतील. वेगळा दबाव जर कोणावर असेल तर तो झुगारून आपण एकत्रितपणे पुढे जाऊ, आमच्या ताटातील भाकरी घेऊ नका. तुम्ही देणारे आहात, असे करू नका. तुम्ही आरक्षण घ्या परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण मिळवा. सर्वांनी या आरक्षण अध्यादेशा विरोधी हरकती नोंदवाव्यात. एकत्रित हरकती संकलनासाठी पाथर्डीत कार्यालय सुरू करणे शक्य आहे. असे खेडकर म्हणाले. यावेळी आवाहन करताना आंधळे महाराज म्हणाले, सर्व बलुते आलूते यांनी पारंपारिक व्यवसायाचे साधना सह मेळाव्याला यावे. बैलगाडी, ट्रॅक्टर , जीप, मोटरसायकल, एसटी अशा कोणत्याही वाहनाने या. गारुडी, नंदीबैलावाले, वडारी कैकाडी अशा भटक्या लोकांनी सुद्धा पारंपारिक पद्धतीने या.” त्यांच्या” एवढा पैसा आपल्याजवळ नाही. वेळ कमी आहे. संपर्क व समन्वय यंत्रणा उभारून मेळावा यशस्वी करावा. नगरच्या किल्ला मैदानापुढे नागरदेवळे ग्रामपंचायतच्या वतीने शेवगाव व पाथर्डी तालुक्यातून येणाऱ्या ओबीसी बांधवांना अल्पोपआहाराची सुविधा करण्यात आलेली आहे. यावेळी बोलताना दौंड म्हणाले, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण आंदोलनाच्या निमित्ताने सर्वांना येते. आंदोलनाचे नेते छगन भुजबळ यांनी न्याय हक्कासाठी पुढाकार घेण्याचे धाडस केले. सर्वांनी गट तट पक्षभेद विसरून त्यांच्या मागे ताकद उभी करावी. वेगळा दबाव जर कोणावर असेल तर तो झुगारून आपण एकत्रितपणे पुढे जाऊ. मराठवाड्यातूनही काही बांधव पाथर्डी मार्गे नगरला मेळाव्यासाठी येणार आहेत. रस्त्यावरील सर्व बांधवांनी सहकार्य करावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद सोनटक्के सूत्रसंचालन योगेश रासने तर आभार राजेंद्र दगडखैर यांनी मानले.