पाथर्डी (प्रतिनिधी) :-मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच महिन्यापासून रस्त्यावरची लढाई लढत असलेल्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य होताच शहरातील अजंठा चौक, आंबेडकर चौक, नाईक चौकात सकल मराठा समाजाकडून फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करत व डीजेच्या दणदणाटात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी शहरातून विजयी मिरवणूक ही काढली.
यावेळी सकल मराठा समाजातील विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या आंदोलनासाठी जरांगे मुंबईला जात असताना ही पदयात्रा पाथर्डी तालुक्यातुन गेली त्यावेळी गावोगावच्या सकल मराठा समाज, मुस्लिम समाज, आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादीचे नेते ॲड. प्रताप ढाकणे यांनी मोठ्या उत्साहात मनोज जरांगे यांचे व यात्रेचे स्वागत करून जरांगे यांना पाठिंबा दर्शवला होता. यावेळी तालुक्यातील मिडसांगवी ते करंजी या मार्गावर ठिकठिकाणी जेवण, चहापाणी, नाश्ता, आरोग्य सुविधा याची सोय केली होती.
मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच महिन्यापासून रस्त्यावरची लढाई लढत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अक्षरशः निर्णय घेण्यास भाग पाडल्यानंतर सगेसोयऱ्यांसह मराठा आरक्षण ओबीसी प्रवर्गातून देण्याचा अध्यादेश जारी करण्यात आला. या अध्यादेशाची प्रत व इतर सर्व मागण्या मान्य करु असे आश्वासन मिळाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विविध मंत्री व अधिकारी यांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यानंतर शहरासह तालुक्यातील अनेक गावांत ही मोठ्या उत्साहात जल्लोषात या आरक्षण निर्णयाचे स्वागत व आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मराठा तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, मराठा समाज एकजुटीच्या व विजयाच्या घोषणा देत विजयी मिरवणूक काढली.
सकाळी मुंबई येथे मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर अध्यादेशाला धक्का लागल्यास पुन्हा आझाद मैदानात उपोषण करण्याचा इशारा देत गुलालाचा अपमान करू नका. असा सूचक इशारा सुद्धा सरकारला दिला आहे. यानंतर आपण आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मराठा समाजाचा सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
यावेळी देवा पवार, अंकुश चितळे, उद्धव माने, सोमनाथ माने, बबलू वावरे, सोमनाथ अकोलकर, माऊली कोकाटे, बाळासाहेब बोरुडे, महेश काटे, संजय बोरुडे, परमेश्वर टकले, सचिन वायकर, बबलु खोर्दे, बाबासाहेब मोरे यांच्यासह शेकडो मराठा युवक उपस्थित होते.