देवळाली (प्रतिनिधी) अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये स्वराज्याची स्वप्ने व स्थापना करण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांना देऊन समतेचे स्वराज्य निर्माण करण्यात राजमाता जिजाऊ यांचे योगदान महत्वाचे आहे. आजच्या काळातही राजमाता जिजाऊ यांचे विचार आणि कार्य तसेच स्वामी विवेकानंद यांचे विचारही समाजाला विधायक दिशा देत असल्याचे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक दहातोंडे सर यांनी केले. सौ.लक्ष्मीबाई शांताराम डोके समाज विकास प्रतिष्ठान संचलित न्यु इंग्लिश स्कूल आल्हणवाडी येथे राजमाता जिजाऊ व स्वामीविवेकांनद जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयी मतव्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, आज अनेक क्षेत्रात महिला अग्रेसर दिसत आहेत. अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. यावेळी त्यांनी राजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची वैचारीक, राजकीय, सामाजीक जडणघडण करण्यामध्ये राजमाता जिजाऊ यांचे विचार अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद करून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविणे आवश्यक असल्याचेही सांगितले. आपल्या मुलावर संस्कार करतांना प्रत्येक आईने राजमाता जिजाऊ यांचे विचार आणि चरित्र समोर ठेवणे आवश्यक आहे. स्वराज्याची स्थापना करण्यासाठी जिजाऊचे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना मार्गदर्शन लाभले आहे. आपल्या स्वराज्यात सर्व जातीधर्मातील सामान्य, शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित लोकांना न्याय देत त्यांचा उत्कर्ष कसा साधला जाईल यासाठी त्यांनी वेळोवेळी स्वराज्यास मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आण्णासाहेब पाटील,फुंदे सर यांनी प्रतिमा पूजन केले, त्या नंतर विद्यार्थीनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.सर्व उपस्थितांचे आभार राऊत सर यांनी मानले.