spot_img
spot_img

कायम दुष्काळी पाथर्डीं तालुक्यातील शेतीला हक्काचे पाणी मिळवण्यासाठी लढा उभारावा लागेल – विभागीय प्रदूषण आयुक्त दिलीपराव खेडकर…

पाथर्डी (प्रतिनिधी):- कायम दुष्काळी तालुका म्हणून परिचीत असलेल्या पाथर्डीं तालुक्यातील शेतीला हक्काच्या पाण्यासाठी पक्ष, झेंडे, मतभेद बाजूला ठेवून पाथर्डी तालुक्यातील जनतेने राजकारण विरहित एकजूट दाखवून लढा उभारावा लागेल. आजच मागणी केली तर शेतीसाठी शाश्वत जलस्रोत म्हणून पाट पाणी मिळेल. शासनाने पुर परिस्थितीत अतिरिक्त वाहुन जाणारे व पश्चिम वाहिनी नद्याचे समुद्राला वाहून जाणारे पाणी तालुक्याला द्यावे. सरकारने व लोकप्रतिनिधींनी प्रबळ इच्छाशक्ती दाखवल्यास अशक्य काहीच नाही त्यासाठी आम्ही प्राथमिक स्तरावर तालुक्यातील सर्व भौगोलिक परिस्थितीचा व जलस्रोतांचा सर्व्हे सुरू करीत आहोत. असे प्रतिपादन विभागीय प्रदूषण आयुक्त दिलीपराव खेडकर यांनी केले.
पाथर्डी तालुका जलक्रांती अभियानाची माहिती देण्यासाठी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे, हभप आजिनाथ महाराज आंधळे, माजी सदस्य भगवानराव आव्हाड व पुणे येथील प्रोग्रेसिव्ह इंजिनियर्स या कंपनीचे सर्व्हे करण्यासाठी आलेले कर्मचारी उपस्थित होते.
या सर्वेक्षणात मध्ये गोदावरी व कृष्णा खोरे यापैकी तालुक्याला कुठून पाणी मिळू शकते याची पाहणी करणे. विविध पाणी लवादाचा अभ्यास करणे. प्रत्येक गावाची समुद्रसपाटीपासून उंची मोजणे, गावांना पाटाद्वारे या लिफ्ट द्वारे पाणी आणता येईल याचा काउंटर सर्वे करणे. ले आउट, प्लॅन, डी पी आर, तयार करणे. तो शासनाकडे सादर करून पाण्याची मागणी करणे. पाठपुरावा करून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करणे. प्रसंगी वेगवेगळी आंदोलन करणे. लोक सहभागाची चळवळ उभी करणे. न्यायालयात दाद मागणे. जनजागृती करणे. आदी प्रकारे कृती समिती पाठपुरावा करणार आहे. पुढे बोलताना खेडकर म्हणाले की, देश पातळीवरील भूजल सर्वेक्षण अहवालानुसार तालुक्यातील भूजल पातळी इतर तालुक्यांच्या तुलनेत काही मीटरने खाली आहे. ३५० मिलिमीटर पाऊस पडल्यास भूजल पातळी एका मीटरने वर येते. इतका पाऊस या भागात पडत नसल्याने तालुक्याला भूजलाचा पर्याय येथे गैरलागू ठरतो. पाणी पडतच नाही, तेथे अडवणार आणि जिरवणार कसे, असा तेथील जनतेचा सवाल आहे. राज्यातील इतर तालुक्याच्या मानाने कितीतरी कमी प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडतो.ऊस तोडणीच्या हंगामात या भागातील सुमारे बहुसंख्य लोकांना कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या इतर भागात मजूर म्हणून जावे लागते. कारण अनेक गावांतील ७० टक्के घरांना कुलपे असतात. गावात उरतात ती केवळ शाळेची मुले आणि त्यांना सांभाळणारे आजीआजोबा. ऊसतोडणीचा हंगाम संपवून गावकरी परतले की, पुन्हा टंचाईची भीषणता जाणवायला लागते. शाश्वत शेती उत्पादन मिळत नसल्याने येथील शेतकऱ्यांचा एकूणच आर्थिक स्तर उंचावत नाही व त्यामुळे तालुक्यातील बाजारपेठांना ही अवकळा आली आहे. आणि ही परिस्थिती बदलायची असल्यास यावर एकमेव उपाय म्हणजे शेतीसाठी शाश्वत पाट पाणी मिळवणे हा होय. शेतीला पाणी नाही, दर्जेदार शिक्षण नाही, स्थानिक रोजगार नाही यामुळे तरुण पिढी वैचारिक दिवाळखोरी व व्यसनाच्या गर्तेत सापडली आहे. तालुक्यातील भावी पिढ्यांचा बौद्धिक विकास खुंटला असुन त्यांचा भविष्यकाळ अंधकारमय आहे. यासाठी निस्वार्थ व निरपेक्ष भावनेने सामाजिक काम करताना शेतीच्या पाण्यासाठी शासन दरबारी लढा देणे हा माझ्या कामाचा मुख्य भाग असून प्रसंगी राजकारण विरहित पाणीप्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल. असे मत खेडकर यांनी व्यक्त केले. कृष्णा खोरे व गोदावरी खोरे या योजनेतून तालुक्याला पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करू. तालुक्याच्या हद्दी पासून 16 किलोमीटरवर बोगद्याद्वारे पाणी आले असून मुळा, पैठण व सह्याद्री रांगाच्या मधून समुद्राला वाहून जाणारे पाणी आम्हाला मिळावे यासाठी पाठपुरावा करणार आहे. अडीचशे किलोमीटरवर पाणी जाऊ शकते तर जवळच्या तालुक्याला व आम्हाला पाणी का मिळणार नाही. आम्हाला कोणाच्या हक्काचे पाणी नको असून पूर परिस्थितीत वाहून जाणारे अतिरिक्त पाणी व पश्चिम वाहिनी नद्या वर समुद्राला वाहून जाणारे पाणी जी योजना सरकारच्या विचाराधीन आहे या योजनेतून तालुक्याला पाणी मिळावे अशी आमची प्रामाणिक मागणी आहे. किमान वर्षातून दोन वेळेस तालुक्यातील तलाव, बंधारे, लघु प्रकल्प, मध्यम प्रकल्प पाण्याने भरून मिळाले तरीही तालुका सुजलाम सुफलाम होईल. यामुळे येथून होणारे विस्थापन थांबेल, रोजगार उपलब्ध होईल व बाजारपेठेला ही पुन्हा चांगले दिवस येतील. यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावोगावी जाऊन जनजागृती करणार असून या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व माहिती असलेल्या लोकांना या अभियानाशी आम्ही जोडून घेणार आहोत. या क्षेत्रातील तज्ञ लोकांशी विचारविनिमय करणार आहोत. यासाठी न्यायालयीन लढा लढावा लागला तरी लढु, आम्ही तालुक्याच्या वतीने न्यायालयात रिट पिटिशन दाखल करणार असून त्यासाठी गाव गावचे ठराव घेऊन सरकारकडे आग्रही मागणी करणार आहोत. आम्ही तालुक्यातील सर्वांना पक्ष व राजकारण विरहित जल क्रांती कृती समितीसाठी आवाहन करणार असून ते आले तर त्यांच्यासोबत व नाही आले तर एकला चलो रे अशा पद्धतीने हे अभियान यशस्वी करू व तालुक्याला हक्काचे पाणी मिळवुनच देऊ. असा ठाम विश्वास यावेळी खेडकर यांनी बोलून दाखविला. हा लढा लढताना विघ्नसंतोषी मंडळी शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवु शकतात परंतु शेतकऱ्यांनीही जागृतपणे या प्रश्नाचा विचार करावा व उज्ज्वल भविष्यासाठी या लढ्यास साथ द्यावी असे आवाहन शेवटी खेडकर यांनी केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!