spot_img
spot_img

मा.नगरसेवक रामनाथ बंग मित्र मंडळाच्या वतीने भुमीपुत्रांचा सन्मान….

पाथर्डी (प्रतिनिधी ):- मानवी जीवन अमूल्य असून त्याग व सेवा कार्य करत जीवनाचे कल्याण साधायचे आहे. मनुष्य जन्म हाच मुळी कर्म करण्यासाठी असून चांगले कार्य व पुण्य कर्म करीत लोकांसाठी आदर्श व्यक्तिमत्व बनावे. निस्वार्थ सेवेचा आनंद दुर्मिळ असून अशी माणसे ही समाजाची शक्ती आहे., असे मत शंकर महाराज मठाचे मठाधिपती माधव बाबा यांनी व्यक्त केले. माजी नगरसेवक रामनाथ बंग मित्र मंडळातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वंजारी राजघराण्याचे वंशज नागनाथ गर्जे यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला, तायक्वांदो स्पर्धेत पायल असलकर यांना विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक, तर सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते संजय मेहरकर यांची स्नेहालय संस्थेच्या विश्वस्त पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी पाथर्डी व्यासपीठ चे संघटक अविनाश मंत्री तर प्रमुख पाहुणे म्हणून भैरवनाथ मंदिराचे अध्यक्ष दादासाहेब मर्दाने, खंडोबा देवस्थानचे कार्यवाह उमेश सुपेकर, सामाजिक कार्यकर्त्या भारती असलकर, समता परिषदेचे राजेंद्र दुधाळ, माहेश्वरी समाज संघटनेचे रामभाऊ बजाज आदींसह मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना माधव बाबा म्हणाले ,पाथर्डी तालुका संत महंतांची व तपस्वी साधकांची देवभूमी आहे .अशा भूमीत वावरणारे सर्वजण भाग्यवान असून स्नेहालय सारख्या गुणसंपन्न संस्थेचे विश्वस्त पद तालुक्याला मिळाल्याने तालुक्याचा बहुमान झाला आहे. भोगापेक्षा सेवेत व सुखापेक्षा त्यागात जीवनाचे खरे सूत्र सापडते. आजकाल सेवा कार्य करणाऱ्यांना प्रसिद्धी, पैसा व सत्तेचा मोह आवरत नाही. रामभाऊ बंग मित्र मंडळातर्फे गेले अनेक वर्षंपासून समाजातील सर्व जाती धर्मांच्या व्यक्तींचे सुखदुःखाचे क्षण वाटून घेतले जातात. निरपेक्ष भावनेने काम करणारे अशी मंडळी गावोगावी सुरू झाल्यास सेवा कार्याचा मोठा यज्ञ सुरू होईल. संस्कारी व निरोगी पिढी समाजासाठी देवदुता समान ठरते. ईश्वरी शक्ती अशाच व्यक्तींच्या माध्यमातून संचार करून लोककल्याणाचे कार्य साधते. मोबाईलच्या पुढे जाऊन विशाल समाज जीवन डोळे उघडून पहा, त्यामध्ये ईश्वरी शक्तीची अनुभूती घेऊन सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकाला ईश्वराचे दर्शन घडवणे अशी कार्यपद्धती आत्मसात करावी. बंग मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते कौतुकास पात्र आहेत., असे माधव बाबा म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामभाऊ बंग, सूत्रसंचालन सचिन मुनोत, तर आभार सुखदेव मर्दाने यांनी मानले. विविध व्यक्तीं तर्फे पुरस्कारार्थींचा स्वतंत्रपणे सन्मान करण्यात आला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!