पाथर्डी (प्रतिनिधी):- लोकसभा निवडणुकीसाठीची इच्छुकांची धावपळ सुरू झाली असून शिवराज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नगर लोकसभा मतदारसंघात आमदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने शिव स्वराज्य यात्रा आज श्री क्षेत्र मोहटा देवीला महापूजा करून सुरू झाली. नगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात ही यात्रा जाऊन शिवप्रेमींशी संवाद साधणार आहे.
प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे याचा विचार न करता लोकसभा निवडणूक आम्ही लढवणार असा निर्धार जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणीताई निलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मोहटादेवी इथून शिव स्वराज्य यात्रेचा प्रारंभ आज जोश पूर्ण वातावरणात झाला. त्यानंतर पाथर्डीच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष पोटघन मेजर, करंजीचे सरपंच रफिक शेख, चांद मणियार ,अर्जुन धायतडक, उबेद आतार, बबलू वावरे आदी प्रमुखांसह निवडक कार्यकर्ते उपस्थित होते. नगर मतदारसंघात भाजपच्या वतीने खासदार डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी गृहीत धरली जाते. गेल्या सहा महिन्यांपासून विखे यांनी मतदारसंघात राजकीय फेर जुळणी करत संपर्क मोहीम हाती घेतली असून कार्यक्रमांवर भर दिला आहे. साखर व डाळ वाटप कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसंपर्कावर भर देत त्यांनी शासकीय योजनांची माहिती व केंद्र सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत दिली जात आहे .येत्या 22 तारखेच्या रामजन्मभूमी लोकार्पण सोहळ्याचे निमित्त साधून त्यांच्याकडूनही लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल असा त्यांच्या समर्थकांचा अंदाज आहे. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शहरातील क्रांती चौकात उद्घाटनाची सभा घेतली. राणीताई लंके व आमदार निलेश लंके यांचे पोस्टर असलेल्या जीपवर लाऊड स्पीकर लावून सभेसाठी व्यासपीठ तयार करण्यात आलेले आहे. विविध गाड्यांचा ताफा व प्रतिष्ठानचे पदाधिकारी एकाच वेळी या रथातून गावोगावी जातात. तेथे शिवराज्याभिषेकावर व्याख्यान दिले जाते. यावेळी राणी लंके यांनी मोजक्या शब्दात पत्रकारांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन नगर लोकसभा मतदारसंघात होऊन आमच्या दोघांपैकी कोणीही एक जण निवडणूक निश्चित लढवणार आहे. मतदारसंघातील प्रमुख गावांमध्ये यात्रा जाईल. तेथे अभ्यासू वक्ते व्याख्यान देऊन तरुणाईला शिवरायांच्या पराक्रमाची माहिती देतील. पंधरा दिवसांनी नगर येथे यात्रेची सांगता होईल. प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे याकडे लक्ष न देता आम्हाला उमेदवारी करायचे आहे असा निर्धार आम्ही केला आहे. लोकांची व कार्यकर्त्यांची तशी भावना आहे. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे असा आमचा निर्धार आहे. याबाबत आमदार साहेब लवकरच विस्तृत भूमिका मांडतील, असे लंके म्हणाल्या.