कडा (वार्ताहर) -येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा या संस्थेच्या स्थापनेस शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने व वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून गांधी महाविद्यालयाने दिनांक २ जानेवारी २०२४ रोजी प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम कोण होणार करोडपती या धर्तीवर आयोजित केला होता.या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे मुलांमध्ये स्पर्धा परीक्षे संदर्भात जागृती करणे हा होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार राठी तर प्रमुख म्हणून उपप्राचार्य डॉ. जवाहरलाल भंडारी व शोभाचंद ललवाणी हे होते.
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी महाविद्यालयात शिकत असतानाच सुरू केली पाहिजे व वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविले पाहिजे. महाविद्यालयांमध्ये त्यासाठी वेगवेगळी स्पर्धा परीक्षेची पुस्तके ग्रंथालयामध्ये उपलब्ध करून दिली आहेत व त्याचे वेगळे दालन सुरू केले आहे. प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारीच आहे व यशाची मुहूर्तमेढ ही महाविद्यालयातच रोवली जाते, असे प्रतिपादन प्राचार्य नंदकुमार राठी यांनी केले. यावेळी
उपप्राचार्य डॉ. जवाहरलाल भंडारी यांनी विद्यार्थ्यांना प्रश्नमंजुषेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्यक्षात 21 संघानी(६३ विद्यार्थी) यामध्ये सहभाग घेतला. कटके उमेश, तांदळे विशाल व भोजने लक्ष्मण हा संघ विजेता ठरला. उपविजेते संघामध्ये डोके आदित्य, गोरे संदेश व भैसाडे साई व आहेरकर ज्ञानेश्वर, गणेश पवार व प्रज्वल शेकडे हे होते. या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉ. नवनाथ कराळे, डॉ. योगेश रसाळ, डॉ. चंद्रशेखर तळेकर, डॉ. शिवाजी जगदाळे, डॉ. अमोल कल्याणकर, डॉ. प्रकाश जाधवर, श्री. सोमनाथ हसे, डॉ. धनश्री मुनोत व डॉ. अरुणा कुलकर्णी यांनी प्रयत्न केले.