spot_img
spot_img

पाथर्डीत ॲड. प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे भिक मांगो आंदोलन

पाथर्डी (प्रतिनिधी):- पालिकेची विकास कामे टक्केवारी दिल्या घेतल्याशिवाय होत नाहीत, नदीमध्ये गटारीचे पाणी सोडले जाते, ओढ्यावर जॉगिंग पार्क तर अन्य विकास कामे निकृष्ट होत असून लोकप्रतिनिधींनी टक्केवारीच्या मोहातून बाहेर पडून विकासकामे होऊ द्यावी. ठेकेदारांमध्ये टक्केवारीवरून भांडणे होत असतील तर लोकप्रतिनिधींना टक्केवारी देण्यासाठी रस्त्यावरून झोळी फिरवत ऍड. प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली भीक मांगो आंदोलन कार्यकर्त्यांनी करत बाजारपेठेतून प्रत्येकी एक रुपया गोळा करत जमलेले 790 रुपये मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी ढाकणे यांच्यासह आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते, काँग्रेस व शिवसेना व त्यांचे समर्थक रस्त्याने फिरून प्रत्येक व्यापारी टपरी धारक रस्त्यावरील चपला शिवणारी कारागीर अगदी भिक मागणाऱ्यांनी सुद्धा ढाकणे यांच्या झोळीत पैसे टाकले. मोठी झोळी मिरवत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व अन्य कार्यकर्त्यांनी वाजत गाजत काढलेला भीक मांगो मोर्चा पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली. यावेळी बोलताना ऍड ढाकणे म्हणाले, खुलेनाट्यगृहाची कोटींची कामे लाखात करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला. लोकप्रतिनिधी व त्यांच्या सहकार्याने गेल्या दोन वर्षात सुद्धा मोठा भ्रष्टाचार केला. आम्ही केवळ राजकीय भूमिकेने टीका करतो असं आरोप करत तुम्ही कुरण केली. ऊस तोडणी कामगारांची मुले पैसे खर्चून अभ्यासिकेत जातात, जनतेच्या पैशाने बांधलेली अभ्यासिका मात्र तुमच्या ताब्यात असून ती धुळ खात पडली आहे याची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. पाप कधी ना कधी उघड्यावर येते. गेल्या सात वर्षातील पापे रस्त्यावर उघडी पडली. लोकप्रतिनिधींची 20% रक्कम दे ,असे म्हणत रस्त्यावर गुंडगिरी होऊन ठेकेदारा ला धमकावून काम बंद पाडली जातात, याचा अर्थ सगळ्यांना समजतो .शहरासारखी परिस्थिती तालुक्यातही आहे. अनेक वर्षे बहिणीने (आमदार मोनिका राजळे) त्यांनी जाहीर केलेल्या बाराशे कोटी रुपयांच्या विकास कामांचा हिशोब मागतो, तर त्या देत नाहीत. शहराच्या कुठल्याही दिशेला चला मार्च एंड ची विकास कामे उरकून घेतली जात आहेत. झालेल्या कोणताही रस्ता हाताने उघडून दाखवतो. चार-पाच बगलबच्चांना हाताशी धरून नारळे फोडण्याचा सपाटा लावून पाठ थोपटून तुम्ही घेत आहात. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी मिंधा असेल तर प्रशासनाला काही करता येत नाही. तुम्ही वेळ, तारीख, द्या तुमच्या कोणत्याही साईटवर येतो. तज्ञ माणसे आणू ,काम तपासून त्यांनी दर्जेदार आहे असे सांगितले तर तुमची जाहीर माफी मागतो. दोन वर्षात बंधारे गळती होतात, डांबरी सडक महिन्याभरात उखडते, तुम्ही सांगत नसाल तर, बाराशे कोटीचे किती पैसे खिशात गेले मी सांगायला तयार आहे .प्रशासक असले तरी तुमच्या मर्जीतील माजींचे टोळके पालिकेत कसे घोंगावते. संबंधित यंत्रणा कोणाच्या सूचनेवरून त्यांना बरोबर घेतात. याचा तुम्हाला नसेल पण जनतेला अंदाज आला आहे. ठराविक ठेकेदार, उप ठेकेदार ,तेच तुमच्या सत्तेच, तेच गुंडगिरीत, असे प्रकार आता सर्व शक्तीनिशी रोखण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत अॅड ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता अत्यंत कडक शब्दात टीका केली. यावेळी राष्ट्रवादीचे शिवशंकर राजळे ,बंडू बोरुडे, सिताराम बापू बोरुडे ,देवा पवार, चांद मनियार, आदींसह आपचे किसन आव्हाड, काँग्रेसचे नासिरभाई शेख, जालिंदर काटे, शिवसेनेचे भाऊसाहेब धस व समर्थक सहभागी झाले. अपुरा पोलीस बंदोबस्त असल्याने सर्व तोडफोडीचा प्रकार डोळ्यांनी पाहूनही उपस्थित पोलिसांनी शांत राहणे पसंत केले.

➡️…. . पालिका कामाच्या ठेकेदारांमधील भांडणाचा मुद्दा कळीचा ठरवत ॲड. प्रताप ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांची राजकीय कोंडी करत टीकेचे लक्ष केले. सर्वच प्रकरणांची उजळणी करत राजकीय हवा तापवण्याचा प्रयत्न केला. खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून तेथेही त्यांनी टीकेची संधी सोडली नाही. राजकीय कोंडी राजळे कशी सोडवतात, याकडे त्यांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागली आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!