देवळाली (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील देवळाली व परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. रविवारी शेतकरी मच्छिंद्र साहेबराव तांदळे हे त्यांच्या शेतात जनावरे चारत असताना अचानक वासरावर बिबट्याने हल्ला चढवून त्याचा फडशा पाडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
देवळाली शिवारातील नागझरी वस्तीवरील मच्छिंद्र साहेबराव तांदळे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात आपले जनावरे चारत होते रविवारी दुपारी तीनच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक वासरावर हल्ला चढवून त्यास ठार केले. वासराला ठार केल्याची शेतकऱ्यांनी वनविभागाला कळवताच वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा केला आहे.
शेतमालाला आधीच कवडीमोल भाव असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन करून आपला कसाबसा उदरनिर्वाह करीत आहेत पशुपालन करावे तर बिबट्या पशुधनावर हल्ला करून त्यांना फस्त करत आहे. यामुळे परिसरातील शेतकरी अगोदरच बिबट्याच्या दहशती खाली आहेत.या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
भरवस्ती जवळ असलेल्या शेतात येऊन बिबट्या वारंवार शेतकर्यांच्या पशुधनाची हानी करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत नागरिक व पशुधन यांच्या सुरक्षेसंबंधी ठोस उपाययोजना संबंधित विभाग व प्रशासनाकडून करण्यात याव्यात अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तत्काळ पिंजरा उपलब्ध करावा, व शेतकऱ्यांचे जे आर्थिक नुकसान झाले आहे त्यासाठी तात्काळ मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी पशू शल्यचिकित्सक वनविभाग कर्मचारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. सदर घटनेचा पंचनामा वनविभागाकडे पाठवून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तत्काळ उपाययोजना करणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.