कडा (राजू म्हस्के) :- जय महाराष्ट्र ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री.बबनराव माने यांच्या प्रयत्नातून अपघातग्रस्त ऊसतोड मजुरांच्या वारसांना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी मयत उसतोड कामगारांचे वारसदार व जय महाराष्ट्र ऊसतोड कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .
याविषयी सविस्तर माहिती अशी की, शासन आपल्यादारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून परळी येथे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांच्या हस्ते या वारसदारांना डेमो चेक वाटप करण्यात आले होते परंतु आज प्रत्यक्ष चेक दिले गेले. जय महाराष्ट्र ऊसतोड कामगार संघटनेच्या माध्यमातून ऊसतोड मजूर, वाहतूकदार, मुकादम यांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे . न्यायदानाची लढाई लढत ऊसतोड मजुरांच्या विविध मागण्या संदर्भात प्रशासनाशी तसेच कारखानदाराशी संपर्क करून समस्या सोडवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे जय महाराष्ट्र उसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री बबनराव माने हे दिसून येतात. मागील काही दिवसापासून ऊसतोड मजूर काम करत असताना यामध्येच काळाने घाला घातल्याने अपघात घडले यामध्ये काही मजूर मरण पावले त्यांचा संसार उघड्यावर आला तेव्हा त्यांना धीर देत शासन दरबारी प्रयत्नाची पराकाष्टा करत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड मजूर कल्याण महामंडळाच्या माध्यमातून १)श्रीम.आशा पोपट मस्के २) श्रीम.नंदा गहिनीनाथ मस्के ३)श्रीम.मंगल लक्ष्मण बहिरवाळ ४)श्रीम.छाया शिवाजी काळे ५)श्रीम. रंभा दादा मांडवे ६)श्री.बंडू दत्तात्रय उगले ७)श्रीम. अंजना राम अंकुशे ८)श्रीम. प्रतिक्षा सुशेन अनपट ९) श्रीम. निलावती अशोक कुटे या त्यांच्या वारसदारांना आज बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांच्या हस्ते व जय महाराष्ट्र कामगार संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मयतांच्या वारसदारांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश असा एकूण ४५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला याप्रसंगी उपस्थित समाज कल्याण अधिकारी बीड शिंदे साहेब , महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णा निंबाळकर ,कोटुळे राजेंद्र , धर्मराज मसवले आदी उपस्थित होते .