पाथर्डी (प्रतिनिधी):- अयोध्येतील प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशभरातील विविध संत महंतांच्या उपस्थितीत होत आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्या येथील राम जन्मभूमी येथील गर्भगृहात पूजन व अभिमंत्रित केलेल्या मंगल अक्षतांचे पाथर्डी शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. शहरातील स्व.वसंतराव नाईक चौकात कलशाचे आगमन होताच भाविकांनी मोठ्या उत्साहात ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करत अक्षता कलशाचे मंगलमय वातावरणात पुजन करून स्वागत केले. यानंतर या कलशाची शहरातुन वाजत गाजत सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तरुणांनी दिलेल्या जय श्रीराम च्या घोषणांनी शहर परिसर दुमदुमून गेला. शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विजय हनुमान मंदिरात शोभायात्रेचा आरतीने समारोप झाला.
हिंदू रक्षा युवा मंचच्या तरुणांनी मिरवणुकीचे सुंदर नियोजन केले तर रामराज्य ढोल पथकाने मिरवणुकीत रंगत आणली.
हा कलश शहरातील शेवाळे गल्ली येथे राम मंदिरात काही दिवस दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यावेळी मिरवणूक मार्गात विविध ठिकाणी नागरिकांनी कलशाचे पूजन करुन स्वागत केले.
यावेळी हभप मोहन महाराज सुडके, दिव्य ज्योती जागृती संस्थेचे स्वामी अमोघानंदजी, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे, सचिनदेवा देशपांडे, प्रमोददेवा गर्गे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक अरविंद पारगावकर, भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चोरमले, युवा मोर्चाचे मुकुंद गर्जे, राहुल कारखेले, महेश काटे, अनिल गुरव, कौतुक चिंतामणी , नानासाहेब पालवे, शैलेश शिरसाठ, अमोल भंडारी, पंकज राठी, सचिन नागापुरे, महेश अंतरकर, चैतन्य मेहेर, महेश बाहेती, महेंद्रसिगं परदेशी, रामेश्वर निकम, भास्कर लवांडे, दत्ता दारकुंडे, नागनाथ गर्जे, सुनील पाखरे, आदींसह स्वयंसेवक व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणुकी दरम्यान शहरात हजारो नागरिकांनी अक्षदा कलशाचे पूजन करून दर्शन घेतले. अक्षता कलश पुढील काही दिवसात तालुक्यातील विविध ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी नेण्यात येणार आहे व कार्यकर्ते व कारसेवक तालुक्यातील बहुतांश सर्व घरोघरी जाऊन ह्या अक्षता भाविकांना वाटुन राममंदिर भेटीसाठी आमंत्रण देणार आहेत.
———————————– यावेळी भाजपाचे शहरातील अथवा तालुक्यातील वरिष्ठ नेते, तालुका पदाधिकारी अथवा कुणीही नाईक चौक येथे अक्षता कलशाच्या स्वागतासाठी उपस्थित नव्हते. मात्र मिरवणूक निम्या मार्गावर शहरातील क्रांती चौकात आल्यावर मात्र आमदार मोनिकाताई राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, मृत्युंजय गर्जे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, महेश बोरुडे आदींनी कलशाचे पूजन करून दर्शन घेतले.