आष्टी :(प्रतिनिधी)
माझ्या नऊ वर्षाच्या खासदारकीच्या काळात बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली असून त्यामध्ये रस्त्याचे कामे जास्त झाल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. यापुढेही विकासाची गंगा अशीच वाहत राहणार असून ठेकेदारांनी कामे दर्जेदार करावी. बोगसगिरीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी दिला तर सुरत चेन्नई एक्सप्रेस हायवे हा ३६ किलोमीटर आष्टी तालुक्यातून जात असून त्या हायवेचे एक्झिट गेट आष्टी येथे करण्याची मागणी आमदार सुरेश धस केली.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून तीन कोटी 66 लाख 65 हजार रुपये इतक्या किमतीचा चार किलोमीटरच्या आष्टी तालुक्यातील साबलखेड येथे साबलखेड ते चिंचोली या रस्ता कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना प्रीतमताई मुंडे म्हणाल्या की,गेल्या नऊ वर्षांमध्ये मोदी सरकार आल्यापासून बीड जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहिली आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्गाने जिल्ह्याच्या चारही बाजूने जाळे निर्माण केले असून दर्जेदार रस्ते तयार केले आहेत .रस्ते तयार झाल्याने बाजारपेठ तर वाढते शिवाय सर्वसामान्य लोकांना दिलासाही मिळतो. तसेच बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून लोकसभा निवडणुकीपूर्वी बीड पर्यंत रेल्वे घेऊन जाण्याचे उद्दिष्ट आहे मात्र भूसंपादनाच्या अनेक अडचणी येत होत्या त्या अडचणी सोडवण्यासाठी मी स्वतः स्थळ पाहणी करून रेल्वे अधिकारी व महसूलच्या अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन तेही प्रश्न आता निकाली काढलेले आहेत .मागील तीन वर्षात महाविकास आघाडी सरकार असल्याने बीड रेल्वेला दमडीही दिली नसल्याने हे काम रखडले होते परंतु आता शिवसेना-भाजप युतीचे सरकार पुन्हा राज्यात सक्रिय झाल्याने राज्य सरकारचा वाटा ते आता वेळोवेळी रेल्वेसाठी देत आहे .त्यामुळे आता रेल्वेचे काम थांबणार नाही. प्रलंबित मावेजाचा प्रश्न लवकरात सुटत गेला आहे.
यावेळी आमदार सुरेश धस यांनी सांगितले की साबलखेड ते चिंचोली हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तीन कोटी 66 लाख 35 हजार रुपये किंमतीचा आहे. 4.2 किलोमीटर इतका रस्ता असून त्यामध्ये 3.75 किलोमीटर डांबरी तर 0.45 मीटर सिमेंट रस्ता होणार आहे या रस्त्यावर छोटे-मोठे 12 पूल असून यामुळे परिसरातील लोकांची सोय होणार आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेची सुरुवात 1999 ते 2004 या काळामध्ये तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती. त्यानंतर दोन वेळा मनमोहन सिंग यांचे सरकार आले त्यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेला एक पैसाही दिला नाही 2014 साली नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी पुन्हा ही पंतप्रधान ग्राम सडक योजना सुरू केली असून या योजनेला मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला जात आहे. बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग होण्यासाठी पंकजाताई मुंडे, प्रीतम ताई मुंडे यांनी मोठे प्रयत्न केलेले आहेत तसेच सध्या आष्टी ते साबलखेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून ते काम गेल्या नऊ महिन्यापासून अतिशय संथ गतीने सुरू आहे हे काम जलद गतीने करून ग्रामस्थांना दिलासा देण्याची मागणी आमदार धस यांनी केली. तसेच सुरत चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग एक्सप्रेस वे आष्टी तालुक्यातून 36 किलोमीटर जातो त्याचा एक्झिट पॉईंट आष्टी येथे देण्याची मागणी ही आमदार धस यांनी केली. तसेच साबलखेड ते पिंपरखेड या रस्त्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले.
यावेळी अजय धोंडे, वाल्मीक तात्या निकाळजे, विजय गोल्हार, राजेंद्र दहातोंडे, रावसाहेब लोखंडे, हनुमंत अडागळे, रामहरी महानोर, अनिल ढोबळे, शरद देसाई,उध्दव कर्डीले, अनिल ढोबळे,नवनाथ गाडे,शिवाजी बुरंगुले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.